Pimpri News : बोलीभाषेतूनच होते प्रमाणभाषेची निर्मिती : प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले

एमपीसी न्यूज : समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने भाषा पंधरवड्याचे औचित्य साधून ‘कवितेकडून कवितेकडे’ या उपक्रमांतर्गत ‘मराठी प्रमाणभाषेत बोलीभाषेचे स्थान’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळेस कोणत्याही प्रमाणभाषेची निर्मिती ही बोलीभाषेतूनच होते’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केले. काल हा कार्यक्रम पुनुरुत्थान समरसता गुरुकुलम, पिंपरी येथे पार पडला.

यावेळेस साहित्यिक डॉ. रवींद्र तांबोळी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन निंबाळकर आणि ज्योती निंबाळकर, प्रकाशक नितीन हिरवे, समरसता साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष शोभा जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

दुधामध्ये साखर मिसळावी तशी बोलीभाषा ही प्रमाणभाषेत विरघळलेली असते. संत-पंत-तंत काव्यामध्ये बोलीभाषेतील शब्द आढळतात. बोलीभाषेमुळे प्रमाणभाषा समृद्ध झाली आहे; म्हणून आपल्या परंपरा पाळून मराठीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष न करता तिचा वापर करणे आवश्यक आहे, असे विचार प्रमुख वक्ते रवींद्र तांबोळी यांनी मांडले. तसेच मराठी बोलीभाषेतील शब्द प्रमाणभाषेमध्ये आवर्जून वापरले जावेत, अशी अपेक्षा सुहास घुमरे यांनी प्रास्ताविकातून व्य्क्त केली.

कार्यक्रमात हिंदी भाषेमध्ये ‘ळ’ वर्णाक्षराचा वापर करण्यात यावा यासाठी केंद्रीय पातळीवा पाठपुरावा करणा-या प्रकाश निर्मळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

निमंत्रितांच्या बोलीभाषा कविसंमेलनात मंगला पाटसकर, माधुरी विधाटे, नीलेश शेंबेकर, सुप्रिया लिमये, समृद्धी सुर्वे, उज्ज्वला केळकर, वैशाली मोहिते आदींनी निरनिराळ्या बोलीभाषांमधील विविध आशयाच्या कवितांचे  सादरीकरण करीत उपस्थित रसिकांची मने जिंकून उत्स्फूर्त दाद मिळवली. अभिजीत काळे यांनी संस्कृत सुभाषित सादर करून काव्य मैफिलीला सुरवात केली तर याचा समारोप स्नेहा गवंडे यांच्या ‘कवितेवरील कवितेने’ करण्यात आला.

गर्भावस्थेत भाषेचे संस्कार होत असल्याने बोलीभाषा ही आपल्या रक्तातच भिनलेली असते. त्यामुळे आपली विचारप्रक्रियादेखील बोलीभाषेतूनच चालते. निसर्गाच्या आविष्कारातून प्राकृतभाषा निर्माण झाली. त्यामुळे कोणत्याही शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतपेक्षा ‘गाथासप्तशती’ , ‘विवेकसिंधू’ , ‘लीळाचरित्र’ या प्राकृत भाषेतील प्रमाणग्रंथांमध्ये शोधायला हवी. तेराव्या शतकात पश्चिम महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या बोलीभाषेतून सध्याची प्रमाण मराठीभाषा निर्माण झालेली आहे, असे डॉ. प्रतिमा इंगोले यांनी सांगितले.

पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंध, रामचंद्र प्रधान, सुरेश कंक, प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.