International News : या शहरात तब्बल 66 दिवसांनी सूर्योदय होणार !

एमपीसी न्यूज : अलास्कामधील एका शहरात आता पुढचा सूर्योदय थेट 2021 मध्येच होणार आहे. दररोज सूर्योदय आणि सूर्यास्त बघायची सवय असणाऱ्या तुम्हाला हे वाचून नक्कीच लगेच विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. अलास्कातील Utqiagvik नावाच्या शहरात तब्बल 66 दिवसांनी सूर्योदय होणार आहे. या शहरातील या वर्षीचा शेवटचा सूर्यास्त 18 ऑक्टोबर रोजी झालाय. अनेक लोकांनी या वर्षीच्या शेवटच्या सूर्यास्ताचा व्हिडीओ आणि फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत 

दरवर्षी होणाऱ्या या बदलाला ‘पोलर नाईट’ असं म्हणतात. या भागात 23 जानेवारी 2021 पर्यंत सूर्योदय होणार नाही. मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की त्या काळात फक्त अंधारच राहिल. या ठिकाणी दिवसातून काही तास प्रकाश असेल, फक्त आकाशात सूर्य तळपताना अथवा चमकताना दिसणार नाही.

इंस्टाग्रामवर kirsten_alburg यांनी सूर्यास्ताचा एक छोटासा व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी म्हटलं आहे की हा Utqiagvik मधील वर्ष 2020 चा शेवटचा सूर्यास्त आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी हा क्षण पाहताना डोळे ओले झाल्याचंही म्हटलं.

शाळेच्या दिवसांमध्ये अनेकांनी वाचलं असेल की पृथ्वी आपल्या अॅक्सिसवर तिरकी उभी आहे. त्यामुळे पृथ्वीची दोन्ही ध्रुव (पोल्स) म्हणजेच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावर सूर्याचा प्रकाश एकाचवेळी पडत नाही. यामुळेच उत्तर ध्रुवातील या भागात 6 महिने दिवस असेल, तर दक्षिण ध्रुवावर त्या काळात रात्र असते.

उत्तर ध्रुवाला आर्कटिक सर्कल म्हणतात. दुसरीकडे दक्षिण ध्रुवाला अंटार्कटिक सर्कल म्हणतात. अलास्काचं Utqiagvik शहर आर्कटिक सर्कलमध्ये येतं. त्यात हे छोटंसं शहर इतर शहरांच्या तुलनेत जास्त उंचीवर आहे. अशात 18 नोव्हेंबरनंतर या शहराच्या आकाशात सूर्य नसल्यात जमा आहे.

नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत Utqiagvik मध्ये कडाक्याची थंडी पडते. या काळात येथील तापमान मायनस 23 डिग्रीपर्यंत खाली जाते. याशिवाय येथील दृष्यता देखील प्रचंड कमी होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.