Pune : एल्गार परिषद : पाच जणांची स्थानबद्धता कायम ; सर्वोच्च न्यायालयाने निकाल ठेवला राखून

एमपीसी न्यूज : नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून पुणे पोलिसांनी कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा या पाच विचारवंतांची स्थानबद्धता कायम राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. रोमिला थापर आणि इतरांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली.

पुण्यात आयोजित एल्गार परिषदेच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर प्रतिबंधक हालचाली कायदा आणि विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कवी वरवरा राव, अॅड. सुधा भारद्वाज, अॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलाखा या पाच जणांना अटक केली होती. या पाचही आरोपींचा नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र, या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली आहे.

सिद्ध इतिहासकार रोमिला थापर आणि इतरांनी या पाच कार्यकर्त्यांच्या अटकेची स्वतंत्र चौकशी करून त्यांची तातडीने सुटका करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. रोमिला थापर, अर्थतज्ज्ञ प्रभात पटनायक, देवकी जैन, समाजशास्त्राचे प्राध्यापक सतीश देशपांडे आणि मानवी हक्क वकील माजा दारुवाला यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली.

कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी गृहकैदेत असलेल्या पाच कार्यकर्त्यांविरोधात पुणे पोलिसांनी बनावट पुरावे तयार केल्याचे आढळल्यास या प्रकाराच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.