Dehuroad : वाहनचालकांना अडवून लूट करणारा आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज – वाहनचालकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून त्यांना लुटणा-या आरोपीला देहूरोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यासोबत एका अल्पवयीन आरोपीला देखल ताब्यात घेतले आहे. सोन्या उर्फ समीर जालिंदर बोडके (वय 24, रा. गहुंजे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 12) रात्री साडेदहाच्या सुमारास गहुंजे-मामुर्डी रोडवरून एकजण दुचाकीवरून जात होता. मामुर्डी गावाच्या हद्दीत दोन जणांनी मोटारसायकल वरून येऊन त्यांच्या दुचाकीला अडविले. त्याला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण करून दुचाकीवर जबरदस्तीने बसवून दूरवर घेऊन जाऊन सोन्याचे दागिने, मोबाईल फोन असा एकूण 72 हजारांचा ऐवज लुटला. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना देहूरोड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळवून सोन्याला अटक केली. तर त्याचा एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली असून दोघांकडून लुटलेले सोन्याचे दागिने, मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, सहाय्यक फौजदार सावंत, पोलीस नाईक प्रमोद उगले, योगेश जाधव, मयुर जगदाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुमित मोरे, सागर शेळके यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.