Maharashtra News : हा प्रकार तुम्हाला नवीन असेल मला नाही – शरद पवार

एमपीसी न्यूज – राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. असा प्रकार सन 1980 साली देखील झाला होता. हा प्रकार इतरांसाठी नवीन असेल. (Maharashtra News ) पण मला नवीन नाही, अशी रोखठोक भूमिका शरद पवार यांनी केली आहे.

Bhosri : आयएमए भोसरी शाखेतर्फे दुर्गा टेकडी प्राधिकरण येथे सिपीआरचे प्रात्यक्षिक

शरद पवार म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान यांनी एक स्टेटमेंट केले, ते कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी बद्दल होते. राष्ट्रवादी पक्ष हा राजकारणात सापडलेला पक्ष असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे आरोप केले होते. पण लगेच दोन दिवसांनी राष्ट्रवादीच्या काही लोकांना त्यांनी सहभागी करून घेतले. त्यावरून पंतप्रधानांनी केलेले आरोप चुकीचे होते, हे स्पष्ट झाले.

काही सहकाऱ्यांनी पक्षाच्या वेगळी भूमिका घेतली. सहा तारखेला राज्यातील महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. त्यात संघटनात्मक बदल करण्याचा विचार करणार होतो. यापूर्वी पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते.

 

त्यापूर्वीच काहींनी वेगळी भूमिका घेतली आणि आम्हीच पक्ष आहोत अशी भूमिका मांडली. जे सहभागी झाले, त्यातील काहीजणांनी माझ्याशी संपर्क  केला आणि म्हणाले की, आम्हाला इथे आमंत्रित करून आमच्या सह्या घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे पुढील दोन तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.

पक्षाच्या भवितव्याबाबत बोलताना पवार म्हणाले, हा प्रकार मला नवीन नाही. हा आजचा प्रकार इतरांना नवीन असेल. सन 1980 साली निवडणुकीनंतर मी ज्या पक्षाचे नेतृत्व करीत होतो. त्या पक्षाचे 58 आमदार निवडणून आले होते.

 

आणि एक महिन्यानंतर सहा वगळता सर्वजण पक्ष सोडून गेले. त्यानंतर मी पाच लोकांचा नेता झालो. त्या पाच जणांना सोबत घेऊन पक्ष बांधायला मी महाराष्ट्रात बाहेर पडलो. त्यानंतर पाच वर्षात निवडणूक झाली. त्यात आमच्या पक्षाची संख्या 69 वर गेली. आमच्या पक्षाची संख्या वाढली. जे सोडून गेले त्यापैकी तीन ते चार वगळता सर्वजण पराभूत झाले.

त्यामुळे 1980 ला जे घडलं तेच पुन्हा करण्याचा माझा प्रयत्न असेल. सबंध महाराष्ट्रात ज्या ठिकाणी जाता येईल तिथे जाऊन लोकांना खरी परिस्थिती सांगू. उद्या सकाळी मी बाहेर पडणार आहे. कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत सातारा येथे एक मेळावा घेणार आहे. त्यानंतर मी राज्यात आणि देशात जेवढं जाता येईल, तेवढा प्रयत्न करणार असल्याचेही पवार म्हणाले.

जे चौकटीच्या बाहेर गेले त्यांच्यावर कारवाई

पक्षाशी विसंगत धोरण राबविल्याने अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का, असा प्रश्न विचारला असता शरद पवार म्हणाले, जे चौकटीच्या बाहेर गेले त्यांच्यावर कारवाई करावी लागेल. या शपथविधीला जे गेले त्यातील काहीजण बळजबरीने गेले आहेत. त्यामुळे याचाही विचार केला जाईल. शपथविधीपूर्वी फक्त छगन भुजबळ यांच्याशी बोलणे झाले होते. अजित पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असेही पवार यांनी सांगितले.

घर फुटलं असं अजिबात वाटत नाही

आजचा प्रकार हा घराचा नाही. तो पक्षाचा आहे. पक्ष फुटला घर फुटलं असं अजिबात वाटत नाही. जे गेले याची चिंता नाही. मला त्यांच्या पुढील भविष्याची चिंता आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.