Wakad : बांधकाम साइटवर टोळक्याचा हैदोस

कामगार व सुरक्षारक्षकांना काम न करण्याची धमकी

एमपीसी न्यूज – बांधकाम साइटवर राहणा-या कामगारांनी व सुरक्षारक्षकांनी काम करू नये, यासाठी दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने बांधकाम साइटवर हैदोस घातला. कामगारांना दमदाटी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना आयसलँड सोसायटीसमोर वाकड येथे घडली. विशाल कांतीलाल जैन (वय 45, रा. नवी पेठ, पुणे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विशाल संजय गायकवाड व त्याच्या दहा ते पंधरा साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड मधील आयसलँड सोसायटीसमोर फिर्यादी जैन यांची बांधकाम साईट सुरू आहे. 27 एप्रिल रोजी या साइटवर आरोपी विशाल आणि त्याचे दहा ते पंधरा साथीदार आले. त्यांनी साइटवर असलेल्या कामगारांना दमदाटी व शिवीगाळ करून ‘तुम्ही येथे काम करायचे नाही, येथून निघून जा’ असे म्हणत काम चालू ठेवल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी बांधकाम साइटवर एक पत्र्याचे शेड मारून त्यात एका जोडप्याला ठेवले.

पत्र्याच्या शेडमध्ये राहणारा व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा असल्याने कामगारांनी घाबरून याबाबत कुठेही वाच्यता केली नाही. मात्र त्याची दहशत दिवसेंदिवस वाढत गेल्याने बांधकाम साईट वरील सिक्युरिटी सुपरवायझर रामविलास यांनी जैन यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.