Pune News : राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी रस्त्यावर व्यापाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

एमपीसी न्यूज : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज लक्ष्मी रस्त्यावर काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. जमावबंदी असतानाही व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वार्टर गेट पर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली होती. 

 

व्यापाऱ्यांनी यावेळी दुकाने बंद ठेवण्याचा निषेध करत मेरा पेट, मेरी मजबुरी, दुकान खोलना हे मजबुरी यासारखे फलक हातात घेऊन झळकावले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यापारीही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.

या आंदोलनात पुणे व्यापारी महासंघाचे संलग्न असणाऱ्या शहरातील 82 संघटना सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात किरकोळ आणि घाऊक अशी जवळपास 40 हजार दुकाने बंद आहे. शहरातील मध्यवर्ती परिसरात असणाऱ्या मंगळवार पेठ, नाना पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, शिवाजी रस्ता येथील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक, कॉम्पुटर, सायकल, केमिकल, ऑटोमोबाईल, पेपर प्लास्टिक यासारखे संपूर्ण दुकाने बंद आहे.

या दुकानांमधून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात ही साहित्य पाठवले जाते. परंतु ही दुकाने बंद असल्यामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.