Pune News : धानोरीतील पोरवाल रस्त्यावरील सुटणार वाहतूक कोंडी 

आमदार सुनिल टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश; 24 मीटर रुंदीच्या नवीन रस्त्यास महापालिकेची मंजुरी

एमपीसी न्यूज – धानोरी येथील पोरवाल रस्त्याला समांतर असा 24 मीटर रुंदीचा नवीन पर्यायी रस्ता आखण्यास महापालिकेच्या शहर सुधारणा समितीबरोबर महापालिकेच्या मुख्य सभेतही मंजुरी देण्यात आली. राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर या रखडलेल्या रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पोरवाल रस्त्यावरील वाहतुक कोंडीचा प्रश्न आता सुटणार आहे.

पोरवाल रस्ता परिसरात गेल्या काही वर्षांत 500 पेक्षा अधिक सोसायट्या उभ्या राहिल्या आहेत. या भागात जाणारा पोरवाल रस्ता हा एकमेव पर्याय असल्याने वाहतुक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. हा प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी या रस्त्याला पर्याय म्हणून 205 अंतर्गत सुधारित रस्त्याची आखणी करण्यात यावी आणि रस्त्याचे काम मार्गी लागावे अशी मागणी महापालिका प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, त्यावर कार्यवाही होत नसल्याने आमदार टिंगरे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता.

त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने धानोरी स. न. 12, 14, 15 व 17 मधून 24 मीटर रुंदीचा रस्ता कलम 205 अन्वये रस्ता आखण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला. त्यानंतर त्यास मंजुरी देण्यात आली. लगेचच मुख्यसभेत हा प्रस्ताव दाखल करून घेऊन त्यास मंजुरी देण्यात आल्याचे आमदार टिंगरे यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

या प्रस्तावास मंजुरी मिळताच आमदार सुनिल टिंगरे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीत या रस्त्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मी दिले होते. त्यानुसार दोन वर्षांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अधिवेशन सुरू असतानाही मी शहर सुधारणा समिती आणि मुख्यसभेला स्वत: उपस्थित राहून हा प्रस्ताव मंजुर करून घेत दिलेले आश्वासनपुर्ती केली आहे.”

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.