Pimpri News: पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांना शास्तीकर वगळून मूळ कर भरता येणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार संगणक प्रणालीमध्ये बदल

एमपीसी न्यूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने संगणक प्रणालीमध्ये बदल केला आहे. त्यामुळे नागरिकांना अवैध बांधकाम शास्ती वगळून मूळ मालमत्ता कर भरता येणार आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असून शास्तीकर वगळून मूळ कर भरता येणार असल्याने थकीत कराचे ओझे कमी होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष, नगरसेवक अजित गव्हाणे यांनी पाठपुरावा केला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, “महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना शास्तीकराशिवाय मूळ कर स्वीकारला जात होता. पण,
मागील भाजपच्या पाच वर्षाच्या राजवटीत शास्तीकराशिवाय मूळ कर स्वीकारला जात नव्हता. त्यामुळे नागरिकांकडून मूळ कराचा भरणा केला जात नव्हता. परिणामी, नागरिकांच्या डोक्यावर थकीत कराचे ओझे वाढत होते. त्यासाठी शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारावा अशी नागरिकांची मागणी होती. शास्तीशिवाय मूळ कर भरण्याची नागरिकांची तयारी होती आणि आहे. शास्तीकराशिवाय मूळ कर स्वीकारला जात नसल्याने महापालिकेच्या महसूलावरही मोठा परिणाम होत होता”.

त्यामुळे शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारावा यासाठी उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली. अजितदादांनी तत्काळ महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. नागरिकांना शास्तीकर वगळून मूळ कर भरता यावा यासाठी संगणक प्रणालीमध्ये तातडीने बदल करण्याच्या सूचना अजितदादांनी दिल्या. त्यादृष्टीने आयुक्त पाटील यांनी संगणक प्रणालीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी शास्तीशिवाय मूळ कराचा भरणा करावा. जेणेकरून डोक्यावर थकीत कराचे ओझे राहणार नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार संगणक प्रणालीमध्ये बदल – आयुक्त पाटील

शहरातील नागरिकांच्या डोक्यावर थकीत मालमत्ता कराचे ओझे राहू नये यासाठी शास्ती वगळून मूळ मालमत्ता कर स्वीकारावा. त्यासाठी महापालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये आवश्यक बदल करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार शास्तीकर वगळून मूळ कर स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मूळ कराचा भरणा वाढेल असे महापालिका आयुक्त राजेश पाटील म्हणाले. तसेच याबाबत राज्य सरकारलाही पत्र दिले असून त्यावरही लवकरच निर्णय होईल, असेही ते म्हणाले.
..

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.