Wakad : वाकड परिसरात भरदिवसा दोन घरफोड्या; चार लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – वाकड परिसरात थेरगाव आणि पुनावळे येथे भरदिवसा दोन घरफोड्या झाल्या. त्यामध्ये 3 लाख 96 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 14) घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पहिल्या घटनेत प्राची निलेश तिकोणे (वय 27, रा. अभिजित पार्क, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्राची यांचे घर सकाळी दहा ते दुपारी पावणे तीनच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले सुमारे 3 लाख 26 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

तर, दुस-या घटनेत लीलाधर शरद राणे (वय 36, रा. संत तुकाराम ब्रिज जवळ, पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे. लीलाधर हे नोकरी करतात. नोकरीसाठी ते सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून घराबाहेर पडले. ही संधी साधून अज्ञात चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 70 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. सायंकाळी सहा वाजता लीलाधर घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याबाबत वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.