Dehuroad : वाहन चालकाकडे चौकशी करणा-या दोन पोलिसांना मारहाण

एमपीसी न्यूज – विरुद्ध दिशेने आलेल्या एका मालवाहतूक रिक्षाने वाहतुकीस अडथळा निर्माण केला. याबाबत त्या रिक्षा चालकाकडे विचारपूस करणा-या दोन पोलिसांना तिघांनी मिळून मारहाण केली. तसेच पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. ही घटना 11 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेबारा वाजता तळवडे चौकात घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

पंकज कृष्णाजी आवटे (वय 31), कृष्णाजी भिकाजी आवटे (वय 61, रा. तळवडे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर मालवाहतूक रिक्षा (एम एच 14 / एफ टी 1061) हा पळून गेला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी योगेश देवराम बोटे (वय 40) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस कर्मचारी योगेश बोटे तळवडे चौकात वाहतुकीचे नियमन करत होते. सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास मालवाहतूक रिक्षा विरुद्ध दिशेने बेदरकारपणे आला. त्यामुळे तळवडे चौकातील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. पोलीस कर्मचारी त्या रिक्षा चालकाकडे चौकशी करत असताना आरोपी तिथे आले. त्यांनी पोलिसांच्या अंगावर धावून येत फिर्यादी बोटे यांना मारहाण केली. तर पोलीस नाईक निघोट यांना शिवीगाळ करून धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.