Uddhav Thackeray : …हा तर पन्नास खोक्यांचा खोकासूर; उद्धव ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल

एमपीसी न्यूज – शिवतीर्थावरील दसऱा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाबरोबरच भाजपवर देखील सडकून टीका केली. ‘यंदाचा रावण वेगळा आहे, आतापर्यंत 10 तोंडांचा रावण होता, आता 50 खोक्यांचा खोकासूर आहे.’  अशी कोटी करीत ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्ला चढवला. भाजप-सेनेत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं, याचा पुनरुच्चार करीत आपण आई-वडिलांची शपथ घेऊन हे खरं बोलतोय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

भाषण सुरू करण्यापूर्वी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सभेस उपस्थित जनसमुदायास मोर डोके टेकवून नमस्कार केला. त्यानंतर भाषण चालू होताच ठाकरे यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुढे भाजप-सेना युतीबद्दल बोलताना उद्धव यांनी आमच्यात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचं ठरलं होतं, असं म्हणत ठाकरे यांनी त्यांच्या आई-वडिलांची शपथही घेऊन मी खरं बोलतोय असं म्हटलं.

‘शिवसैनिकांना धमकावण्याचं काम सुरु, जर शिवसैनिकांवर अन्याय कराल तर तो सहन करणार नाही, तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा’ असे ठाकरे म्हणाले. तसंच ”आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही डुकरं पाळायची” असा टोलाही ठाकरे यांनी भाजपला लगावला.

फडणवीस एक सभ्य गृहस्थ आहेत. ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येणार होते, आले पण दीड दिवसांत त्याचं विसर्जन झालं आताही त्यांना जबरदस्ती उपमुख्यमंत्री बनावे लागले आहे, या शब्दांत ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडवली.

देशातील सर्व पक्ष संपणार आणि एकच पक्ष राहणार, देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे नेण्याचं काम सुरु आहे, अशी टीका ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. ”ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही आमच्या गटात या अन्यथा केसेस काढतो’ असे धमकाविण्यात आहे, असा आरोप त्यांनी केला.

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना मारण्याचा कट रचल्याची अफवा पसरवणारा गजाआड

भाजप गाईवर बोलतं, पण त्यांनी महागाईवर बोललं पाहिजे, असा चिमटा ठाकरे यांनी भाजपला काढला. 2014 मध्ये मोदी सरकार आल्यापासून रुपया घसरत असून ही देशाची घसरण असल्याची टीका त्यांनी केली.

अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत की भाजपचे, असा सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. देशाची काम करण्यापेक्षा ते निवडणूकां असलेल्या राज्यांमध्ये फिरत बसतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. भाजपने आम्हाला पाक व्याप्त काश्मीर पुन्हा घेऊन दाखवावा, मग आम्ही स्वत: आधीप्रमाणे भाजपला डोक्यावर घेऊ, असंही ठाकरे म्हणाले.

शिंदे गट व भाजप सरकारला उद्या शंभर दिवस होतील त्यात 90 दिवस दिल्लीवारीत गेले गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, अशी सरकारची अवस्था आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शिंदे गट म्हणजे शिवसेनेला लागलेले बांडगुळ होते, ते छाटले गेले हे चांगलचं झाले, असे ठाकरे म्हणाले. सर्वांच्या साथीने पुन्हा आपण सत्ता आणू आणि पुन्हा सेनेचा मुख्यमंत्री करु, असा विश्वास व्यक्त करीत ठाकरे यांनी भाषणाचा समारोप केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.