Rajguru Nagar News : “मूल समजून घेताना” चर्चा, संवाद यातून सुवर्णमध्य काढा- डॉ. गायकवाड;”केटीईएस” इंग्रजी माध्यम विद्यालयात पालकांसाठी समुपदेशनपर व्याख्यान

एमपीसी न्यूज – कोरोनानंतर शाळा, शिक्षण पद्धती यांच्या व्याख्या सर्वार्थाने बदलल्या.यामध्ये सर्वात मोठा बदल विद्यार्थ्यांना स्वीकारावा लागला.यातून पालकत्व, संगोपन यांच्या प्रत्येक वळणावर अडचणी उभ्या राहत आहेत. मात्र या अडचणींना दूर करण्यासाठी आणि “आपले मूल समजून घेण्यासाठी” विद्यार्थी आणि पालक यांनी सुवर्णमध्य काढायला हवा.चर्चा संवाद यातून हे प्रश्न सुटू शकतात,असा सल्ला व्याख्यात्या व समुपदेशक डॉ. नीलिमा गायकवाड यांनी दिला.

पालकांच्या विविध अडचणी, प्रश्न, समस्येवर मार्गदर्शन करुन मुलांना कसे समजून घेतले जावू शकते यावर राजगुरुनगर येथील के.टी. ई.एस.इंग्रजी माध्यम विद्यालय, प्राथमिक विभागाच्या पालक शिक्षक संघ कार्यकारिणीच्यावतीने “मूल समजून घेताना” या विषयावर पालकांसाठी समुपदेशनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. गायकवाड बोलत होत्या.अध्यक्षस्थानी पालक शिक्षक कार्यकारिणीच्या अध्यक्षा व शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गुजराथी होत्या.व्यासपीठावर कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष अश्विनी भोगाडे, वैशाली कुडेकर, तसेच अनुराधा गायकवाड, ज्योती ठाकूर, कुसुम जाधव, ज्योती राठोड,सुनीता पवार यावेळी उपस्थित होत्या.

डॉ. गायकवाड म्हणाल्या, तब्बल दोन वर्ष कोरोना महामारीच्या काळामध्ये मुले घरात होती. या कालावधीत मुले, पालक, कुटुंबांच्या अधिकाधिक जवळ आली.यातून ते संरक्षित असे वातावरण शोधू लागले.नेमक्या माणसांचीच त्यांना सवय लागली.त्यामुळे शाळा सुरू झाल्यानंतर शाळेमध्ये त्यांना एकटेपणाची जाणीव निर्माण झाली.कोणामध्ये मिसळायचे नाही. त्यांना एक प्रकारे या वातावरणाची भीती वाटत होती.यातूनच शाळेत जायचा, अभ्यास करण्याचा कंटाळा निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रारी सध्या पालकांकडून येत आहेत. हा कंटाळा, ही भीती पुढे जाऊन अधिकाधिक गुंतागुंत निर्माण करेल आणि यातून मुलांचे प्रश्न अधिकच तीव्र होत जातील, अशी एक भीती आहे. त्यामुळे मुलांना समजून घेण्याचा, जबाबदारीचा हा काळ आहे.मुलांच्या गेल्या दोन वर्षातील बदलेल्या लाईफस्टाईल मुलांमध्ये ‘अँटी सोशल’ होण्याचा आजार एक प्रकारे बळावत आहे.यातून ती चिडचिडी, रागीट होत आहेत.अनेक पालक या समस्या घेऊन येत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

मुलांना समजून घेताना पालकांनी संवादाचे माध्यम वापरायला हवे, असे सांगून डॉ. गायकवाड म्हणाल्या, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये विविध तांत्रिक गोष्टींचा समावेश झालेला आहे.त्याला त्वरित नाकरता येणे अशक्य आहे. त्यामुळे आपणच आपल्या जीवन पद्धतीमध्ये थोड्या प्रमाणात बदल घडवणे आवश्यक झाले आहे. आरडाओरडा,चिडचिड न करता समंजसपणाने मुलांशी संवाद चालायला हवा. त्यांच्याशी चर्चा करायला हवी. मुख्यत्वे मुलांशी घरामध्ये बोलायला हवे.यातूनच सध्याच्या परिस्थितीमुळे मुलांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल.

कार्यक्रमाचे आभार अजित जरे यांनी मानले.

 

पालकांनो, हे करा

* दररोज मुलांची बॅग चेक करा
* मुलांना विश्वासात घ्या
* प्रश्नांचा भडिमार, आरडाओरडा, मार यापेक्षा प्रेमाने संवाद साधा
* अपेक्षांचे ओझे लागू नका
* मुलांच्या चुकीच्या गोष्टीचे समर्थन करू नका
* मुलांसाठी केलेले नियम घरातील सरसकट सर्वांनी पाळा

मुलांच्या शिक्षणामध्ये शाळेच्या भूमिकेच्या बरोबरीने पालकांची भूमिका देखील महत्त्वाची आहे. सध्या पालक, शिक्षक, शाळा आणि महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थी वेगळ्या परिस्थितीतून मार्गक्रमण करत आहे. यामध्ये आपण सर्वांनी एकत्र येत त्यांना पुढे जाण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे,असे मत मुख्याध्यापिका अनिता गुजराथी यांनी व्यक्त केले.

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊननंतर डिजिटल गॅजेट्सच्या वापराचे प्रमाण वाढल्याने मुले हातात असलेल्या मोबाईलवर शिकतायेत की निरुद्देश वेळ घालवतायेत, याचा अंदाज लावणे सर्वांनाच कठीण होऊन बसले आहे. “पूर्वी मुलांकडून मोबाईल सहज काढून घेता यायचा. आता तसे रोखता येत नाही, कारण केवळ शाळा-क्लासेसच शिक्षणच नव्हे, तर गृहपाठही मोबाईलवरच पाठवला जातो.परिणामी अभ्यास असला काय, नसला काय, मुलांना कारणे मिळाली.त्यामुळे तो खरोखर वाचतायोत की दुसरं काय करतायोत, याबाबत गोंधळ होतो. मात्र यातून आता सुवर्णमध्य काढावा लागणार आहे, असे मत डॉ. नीलिमा गायकवाड यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.