Vadgaon Maval : कन्यारत्न स्वयंम सुरक्षा अभियाना अंतर्गत मुलींना मिळत आहेत आत्मसंरक्षणाचे धडे

एमपीसी न्यूज- शहर असो वा गाव आजच्या स्त्रिया कुठेही सुरक्षित नाहीत. अलीकडच्या काळात महिला, अल्पवयीन मुली व मुलांवर अत्याचारच्या घटनात कमालीची वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत स्त्रियांना, युवतींना व विद्यार्थीना स्वतःचे रक्षण स्वतःच करता आले पाहिजे या उद्देशाने कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेत मुलींसाठी कराटेचे प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. माधुरी सातकर शाळेतील मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे देत आहेत.

कान्हे येथील प्राथमिक शाळेत मुलींना स्वतःचे संरक्षण स्वत: करता यावे, त्यांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी बनावे या हेतूने कन्यारत्न स्वयंम सुरक्षा अभियाना अंतर्गत माधुरी गणेश सातकर यांनी हे मोफत कराटे प्रशिक्षण सुरु केले आहे. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थिनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत स्वरक्षणाचे धडे शिकत आहेत.

आजच्या काळात रोडरोमिओंचा व हुल्लडबाज तरुणांचा विद्यार्थिनींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मुलीच्या महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. प्रत्येक वेळी मदतीला कोणी धावून येईल असे नाही. त्यामुळे स्वतःच्या स्व:रक्षणाचे धडे स्वतःच शिकणे व त्यासाठी प्रशिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे मत माधुरी सातकर यांनी व्यक्त केले. कान्हे शाळा व्यवस्थापन समिती,    प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका शोभाताई सुधीर वहिले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आदींनी स्त्रियांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी असणाऱ्या या उपक्रमाचे स्वागत करून माधुरी सातकर यांचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.