Vadgaon Maval : मावळ बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद; मराठा समाजाकडून जालना येथील लाठीमाराचा निषेध

एमपीसी न्यूज – जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ मावळ तालुका मराठा क्रांती मोर्चाने सोमवारी पुकारलेल्या ‘मावळ बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. वडगावसह (Vadgaon Maval) तालुक्याच्या सर्व बाजारपेठांमधील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानदार आणि आस्थापना संचालकांनी सहभाग घेऊन सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवले होते. सकल मराठा समाजाने मोर्चे काढून लाठीमाराचा निषेध केला व सरकारने समाजाच्या तीव्र झालेल्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी केली.

जालना येथे मराठा आंदोलकांवर
झालेल्या पोलिस लाठीमारानंतर सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे.मावळ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी (दि 4) ‘मावळ बंद’ची हाक देण्यात आली होती. तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगावमध्ये या ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य सेवा वगळता येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपले सर्व दैनंदिन व्यवहार बंद ठेवून प्रतिसाद दिला. येथील शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती.

तहसील कार्यालय,पंचायत समिती,भूमी अभिलेख, सहकार निबंधक आदी शासकीय कार्यालयांप्रमाणेच विविध बँकांच्या कामकाजावरही ‘बंद’चा परिणाम झाला. सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वडगाव शहरातून मोर्चा काढला होता. पोटोबा महाराज मंदिर व पंचायत समिती चौकात ठिय्या आंदोलन करून कार्यकर्त्यांनी लाठीमाराचा निषेध केला.

त्याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी अनेक वक्त्यांनी केली. यापूर्वी 58 मोर्चे शांततेत काढणारा मराठा समाज आता आक्रमक झाला असून, त्याच्या तीव्र झालेल्या भावना लक्षात घेऊन लवकरात लवकर आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा होणाऱ्या परिणामांना सरकारने सामोरे जावे, असा इशाराही देण्यात आला.

एक मराठा, लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचे, अशी घोषणाबाजीही करण्यात आली. वडगाव मावळ येथील श्री खंडोबा मंदिरापासून मावळ पंचायत समिती चौकापर्यंत मोर्चा काढून श्री पोटोबा महाराज मंदिर व पंचायत समिती समोरील चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किशोर भेगडे,गणेश भेगडे,तुषार वहिले, भाऊसाहेब ढोरे,दिनेश ठोंबरे,अमोल ढोरे,नितीन जाधव आदींसह भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, मनसेचे तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर,माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर आदींनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

याप्रसंगी शांताराम कदम,माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर, माजी नगरसेवक सुनील ढोरे, पंढरीनाथ ढोरे,विशाल वहिले, अनंता कुडे, किरण म्हाळसकर,शिवसेनेचे अनिल ओव्हाळ,वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष नितीन ओव्हाळ, संतोष मराठे,शरद ढोरे,किरण भिलारे,गणेश ढोरे, बाळासाहेब शिंदे, राजेंद्र कुडे, किरण म्हाळसकर, प्रवीण ढोरे, संतोष पिंपळे आदींसह मोठ्या संख्येने सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.