Vadgaon : कडधे येथील कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या संपर्कातील आठ पैकी सहा जण बाधित

Six of the eight in contact with the corona-positive woman in Kaddhe were infected

वडगाव मावळ – पवन मावळातील कडधे येथे गुरुवारी 70 वर्षीय महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. या महिलेच्या संपर्कातील आठ पैकी सहा व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्यधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कडधे येथे गुरुवारी एक 70 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. खबरदारीचा उपाय म्हणून तिच्या नजीकच्या संपर्कातील आठ व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यातील सहा व्यक्तींचा अहवाल आज, शुक्रवारी पॉझिटिव्ह आला.

दरम्यान, या सहा जणांवर तळेगाव येथील डाॅ. भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत.

कडधे येथे सोमवारी एक 45 वर्षीय पुरुष कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता, तर गुरुवारी (दि. 11) एकाच दिवशी कडधे, माऊ व तळेगाव येथील तीन वृद्ध महिलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे अहवाल आले होते.

मावळ तालुक्यात आत्तापर्यंत 27 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आहे आहेत. उपचारानंतर त्यातील 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कडधे येथील महिला रुग्णांच्या संपर्कातील सहा व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या बारा झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.