Vasant Raiji Passed Away: सर्वांत वयस्कर माजी क्रिकेटपटू ‘वसंत रायजी’ यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन

Vasant Raiji, India's Oldest First-Class Cricketer, Dies At 100 वसंत रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी रचलेल्या 277 धावा मध्ये 68 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती.

एमपीसी न्यूज- प्रथम श्रेणी क्रिकेट इतिहासातील सर्वात ज्येष्ठ क्रिकेटपटू वसंत रायजी यांचे निधन झाले. ते 100 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.

रायजी यांचे जावई सुदर्शन नानावटी यांनी रायजी यांचे वृद्धापकाळाने निधन झाल्याचे सांगितले आहे. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यंदाच्या 26 जानेवारीलाच त्यांनी वयाची शंभरी पूर्ण केली होती.

BCCI ने त्यांच्या मृत्यूची पुष्टी करत ट्विटर वर माहिती दिली आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने रायजी यांना श्रद्धांजली वाहणारं ट्वीट केलं असून त्यांच्या 100 व्या वाढदिवसाच्या आठवणीही त्यातून जागवल्या आहेत. 26 जानेवारी 2020 रोजी वसंत रायजी यांनी वयाची शंभर वर्षे पूर्ण केली. त्यावेळी सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.

वसंत रायजी यांच्याबद्दल हे माहीत आहे का?

वसंत रायजी यांनी 1940 च्या दशकात नऊ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. त्यांनी रचलेल्या 277 धावा मध्ये 68 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती. नागपूर येथे ‘क्रिकेट क्लब ऑफ इंडिया’ संघात त्यांनी पदार्पण केले.

तर विजय मर्चंट यांच्या नेतृत्वात 1941 मध्ये पश्चिम भारत संघ खेळला, तेव्हा रायजी यांचे मुंबई पदार्पण झाले. रायजी हे चार्टर्ड अकाउंटंट आणि क्रिकेट इतिहासकार म्हणून नावाजले गेले. त्यांनी लिहिलेली 8 अनमोल पुस्तके क्रिकेटच्या इतिहासाचे दुर्मीळ साहित्य मानले जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.