Bhosari : शहरात वाहने चोरून ग्रामीण भागात विकणाऱ्या पाच जणांना अटक

20 दुचाकी जप्त; 11 गुन्हे उघड

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात दुचाकी चोरून त्यांची ग्रामीण भागात विक्री करणा-या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 8 लाख 55 हजार रुपये किमतीच्या एकूण 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सात पोलीस ठाण्यातील अकरा गुन्हे उघडीस आले आहेत.

रामेश्वर विलास खंदारे (वय 25, रा. शिवशंकर कॉलनी, चक्रपाणी रोड, भोसरी. मूळ रा. केशवनगर, मसलापेन, ता. रिसोड, जि. वाशीम), अनिल तबा काळे (वय 21, रा. भोसरमाळ, कन्हेर, पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), अविनाश वामन मधे (वय 19, रा. म्हसोबाझाप, पोखरी, ता. पारनेर, जि. अहमदनगर), ओंकार रमेश चव्हाण (वय 19, रा. भोसलेनगर, गोशाळेशेजारी, आळंदी), रामेश्वर परमेश्वर भिसे (वय 21, रा. मरकळ रोड माउली पार्क, राजगुरूनगर बँकेच्या पाठीमागे, आळंदी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांनी वाहन चोरीबाबत दोन तपास पथके तयार केली. या पथकाने खंदारे याला भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी केल्याच्या संशयावरून बीडमधून ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चार दुचाकी चोरल्याचे कबूल केले. त्यावरून त्याला अटक केली. त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. यामुळे भोसरी पोलीस ठाण्यातील दोन, विश्रांतवाडी आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघड झाले आहेत.

अनिल आणि अविनाश यांनाही भोसरी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या. यामुळे भोसरी, पारनेर, जुन्नर, आळेफाटा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण चार गुन्हे उघड झाले. तसेच ओंकार आणि रामेश्वर या दोघांकडून आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. एकूण 8 लाख 55 हजार रुपये किमतीच्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे सात पोलीस ठाण्यातील वाहनचोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, पोलीस हवालदार विवेक श्रीसुंदर, पोलीस नाईक गणेश हिंगे, पोलीस शिपाई समीर रासकर, प्रवीण पाटील, गणेश सावंत, सुधीर डोळस, नितीन खेसे, संतोष महाडिक, बाळासाहेब विधाते, सागर भोसले यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.