Wakad Crime : पत्नी नांदत नाही म्हणून पतीने केले तीन वर्षीय मुलाचे अपहरण; गुन्हे शाखेकडून 12 तासात गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज – पत्नी नांदत नसल्याच्या कारणावरून पतीने त्याच्या एका मित्रासोबत मिळून पोटच्या तीन वर्षीय मुलाचे अपहरण केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 6) दुपारी साडेपाच वाजता जीवन नगर, ताथवडे येथे घडला. गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत 12 तासात आरोपी पती आणि त्याच्या मित्राला बेड्या ठोकल्या आहेत.

महावीर किंचींक साळवे, मितेश उर्फ मितवा मारुती भगत (दोघे रा. मळोली, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अपहरण झालेल्या मुलाची आजी शोभा रामदास डोळस (वय 40, रा. जीवननगर, ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वीरेंद्र महावीर साळवे (वय 3) असे अपहरण आणि सुटका झालेल्या मुलाचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेपाच वाजता जीवननगर ताथवडे येथे वीरेंद्र घरासमोर खेळत होता. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने त्याचे अपहरण केले. याबाबत वाकड पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना गंभीर असल्याने गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी गुन्हे शाखेला याप्रकरणाचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून अपहरण केलेल्या व्यक्तीची ओळख पटवली. मितेश भगत याने हे अपहरण केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मितेश शोध घेत पोलिसांनी त्याला केईएम हॉस्पिटल, रस्ता पेठ पुणे येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वीरेंद्रचे अपहरण वीरेंद्रचे वडील महावीर याच्या सांगण्यावरून केल्याचे सांगितले.

त्यानुसार महावीरचा शोध घेऊन पोलिसांनी महावीर याला उरुळी कांचन बस डेपोच्या मागच्या बाजूला असलेल्या एका घराच्या टेरेसवरून ताब्यात घेतले. मुलाचे अपहरण केल्यानंतर मुलासोबत महावीर नातेवाईकाकडे जाऊन राहिला होता. महावीर आणि वीरेंद्र दोघेही झोपेत असतानाच पहाटे चार वाजता पोलिसांनी महावीरला ताब्यात घेतले.

महावीरची पत्नी त्याच्या सोबत नांदत नाही. त्यामुळे आपल्या मित्रासोबत मिळून वीरेंद्रचे अपहरण केल्याचे महावीरने पोलीस तपासात सांगितले. पोलिसांनी महावीर आणि त्याचा मित्र मितेश या दोघांना वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले. तर वीरेंद्र याला त्याच्या आईच्या ताब्यात दिले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

ही कारवाई कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ. सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, धर्मराज आवटे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे. सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंद, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.