Wakad : महिलेची अश्लील चित्रफीत सोशल मीडियावर टाकण्याची धमकी; आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करून तिची अश्लील चित्रफीत तयार केली. झालेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी देणा-या आरोपीला वाकड पोलिसांनी अटक केली. ही घटना १२ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा ते सायंकाळी साडेसहा या कालावधीत डांगे चौक थेरगाव येथील एका हॉटेलमध्ये घडली. घाबरलेल्या महिलेने गुरुवारी (दि. 20) फिर्याद दिली.

याप्रकरणी 30 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण कृष्णा भालेकर (वय 42, रा. वडगाव शेरी) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेले लग्न झाले आहे. ती एका आयटी कंपनीत काम करत आहे. तिच्या पतीच्या माध्यमातून आरोपी किरण याची तिच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडितेच्या नव-याला चांगले काम मिळवून देतो असे आमिष दाखवून महिलेला डांगे चौकातील एका हॉटेलवर बोलावून घेतले. तिथे त्याने ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे म्हणत तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी केली. तसेच आरोपीने त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवल्यास मूल होणार असल्याचे सांगत महिलेशी जवळीक करून तिच्या इच्छेविरुद्ध बलात्कार केला. या प्रकारची आरोपीने चित्रफीत तयार केली.

घडलेल्या प्रकाराबाबत जर महिलेने कोणास काही सांगितले तर आरोपीने चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी दिली. आरोपीने पीडित महिलेला बराच वेळ हॉटेलच्या खोलीत डांबून ठेवले. या प्रकारानंतर महिला घाबरली. काही कालावधीनंतर तिने तिच्या पतीला घडलेला प्रकार सांगितला आणि त्यांच्या मदतीने वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 20) गुन्हा नोंदवला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला तात्काळ अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.