Wakad : राम जन्मभूमी-बाबरी मशीद निकालाच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज – राम जन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसात लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 5) वाकड परिसरात पोलिसांनी रूटमार्च केला.

वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काळेवाडीमधील पाचपीर चौक, नढेनगर, भारतमाता चौक, काळेवाडी मेन रोड, थेरगाव मधील सोळा नंबर, पडवळनगर या भागात रूटमार्च करण्यात आला. यामध्ये एक सहाय्यक पोलीस आयुक्त, दोन पोलीस निरीक्षक, 11 सहाय्यक पोलीस निरीक्षक-उपनिरीक्षक, 60 पोलीस कर्मचारी, 20 राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सहभागी झाले.

राम जन्मभूमी – बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल येत्या काही दिवसांमध्ये लागण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. हा खटला देशाची सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे. सर्वोच्च न्यायालय याबाबत जो निर्णय देणार आहे, त्याचा प्रत्येक भारतीय नागरिकाने आदर करायला हवा. या निकालानंतर या प्रकरणावर समाजात, समाज माध्यमांवर टीका-टिपण्णी अथवा धार्मिक भावना दुखावणारे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून करण्यात आले आहे. तसेच पिंपरी-चिंचवड सायबर सेलने सोशल मीडियावरील वादग्रस्त हालचालींवर लक्ष ठेवले आहे.

निकालानंतर कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. त्याचे पडसाद शहरात उमटू नये, यासाठी पोलीस विविध पातळ्यांवर सतर्क झाले आहेत. न्यायालयाचा अवमान करणा-या तसेच सोशल मीडियावर समाजविघातक पोस्ट व्हायरल करणा-यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.