Wakad : मुलगा अवैध धंद्याची पोलिसांकडे तक्रार करतो  अन् बाप चोरून गुटखा विकतो

गुटखा विकणाऱ्या एकाला वाकड पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज – मुलगा एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ता बनून पोलिसांना शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्याबाबत निवेदन देतो. अवैध धंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही पोलिसांना त्याच्याकडून दिला जातो. काही कालावधीनंतर पोलिसांच्या जाळ्यात त्याच सामाजिक कार्यकर्त्याचे वडील अवैधरित्या गुटखा विकताना सापडतात. मग  समाजसेवेचा हा अवडंबर  कशासाठी  ? असा सवाल पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून विचारला जात आहे.

अन्वर अली सुभेदार शेख (वय 58, रा. सम्राट चौक, वाकड) असे अवैधरित्या गुटखा विकताना सापडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल सदाशिवराव गवते यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शेख कार (एम एच 31 / डी सी 5103) मधून प्रतिबंधित गुटखा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेख याच्यावर कारवाई केली आहे. आरोपीकडून 60 हजार 206 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि तीन लाख रुपये किमतीची चार जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांनी आरोपी शेख याच्यावर भारतीय दंड विधान कलम 188, 272, 273 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख याचा मुलगा फारुख शेख याने एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पोलिसांना अवैध धंदे बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. पोलिसांनी कारवाई न केल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पोलिसांना देण्यात आला होता. आता त्याच सामाजिक कार्यकर्त्याच्या पित्यावर प्रतिबंधित गुटखा विकताना पोलिसांनी कारवाई केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1