Wakad : पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी तिघांना अटक

एमपीसी न्यूज – ठप्प झालेली वाहतूक पाहून रस्त्याने जात असलेल्या पोलीस शिपायाने कर्तव्यनिष्ठता दाखवत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वाहन थांबविण्यास सांगितल्यावरून तिघांनी पोलीस शिपायाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 6) रात्री सव्वानऊच्या सुमारास वाकड चौक येथे घडली. पोलिसांनी यातील तिघांना अटक केली आहे.

सागर बापूराव झांबरे (वय 21, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी), चेतन ज्ञानदेव पळसकर (वय 30, रा. नखातेवस्ती, रहाटणी), विक्रम रविंद्र सरदेशमुख (वय 29, रा. पवनानगर, चिंचवड) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई जावेद शहाबुद्दीन मुजावर यांनी फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री वाकड चौक येथील फ्लोरेन्स अपार्टमेंटसमोर वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी तेथून जात असलेल्या पोलीस कर्मचारी मुजावर यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहने थांबवण्यास सुरुवात केली. आरोपी सागर याला देखील मुजावर यांनी कार थांबवण्याचा इशारा केला. त्याचा राग आल्याने सागरने ‘तू माझी गाडी का अडवली, तुझा गाडी थांबवण्याचा काय संबंध’ असे बोलून मुजावर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

मुजावर यांनी त्याला शिवीगाळ करण्याचा जाब विचारला असता कारमधील तिघांनी संगनमताने मुजावर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. मुजावर यांचे सहकारी शिपाई ओव्हाळ हे त्या ठिकाणी आल्यानंतर आरोपींनी काळेवाडी फाट्याच्या दिशेने पळ काढला.

  • या घटनेनंतर दाखल झालेल्या पोलीस टीमने कारच्या नोंदणी क्रमांकावरून कार शोधून आरोपींना काळेवाडी येथील तापकीर चौकातून अटक केली. वाकड पोलीस याचा अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.