Wakad : वर्गणीच्या वादातून व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांची निषेध सभा

एमपीसी न्यूज – वाकड येथील मुकेश चौधरी या व्यापाऱ्यासह त्याच्या कुटुंबियांवर वर्गणी न दिल्याच्या रागातून टोळक्याने जीवघेना हल्ला चढविला. या हल्ल्याच्या निषेधार्थ काळेवाडी येथे पिंपरी-चिंचवड व्यापारी आघाडी व पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाच्या वतीने निषेध सभा घेण्यात आली.

निषेध सभेसाठी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सचिन निवंगुणे, जनहित लोकशाही पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष चौधरी, सुधीरकुमार अगरवाल, प्रकाश भंडारी, चंदारामजी भायल, उमेश चौधरी आदी उपास्थित होते. व्यापाऱ्यांनी पीडित मुकेश चौधरी यांच्या उपचारासाठी सुमारे 16 हजार 750 रुपयांची आर्थिक मदत जमा केली. या सभेच्या वेळी जमा केलेली रक्कम त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने म्हणाले, “अनेक वेळेला नागरिक, व्यापारी त्यांच्या समस्या पोलिसांना सांगत नाहीत. न सांगण्यामुळे अनेक अडचणी होतात. नागरिक समस्या सांगत नसतील तर सर्व काही व्यवस्थित चालले असल्याचा पोलिसांचा समज होतो. यामुळे नाहक त्रासाला तुम्हाला सामोरे जावे लागते. न घाबरता पोलिसांकडे या, पोलिसांच्या मदतीने गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण आणता येईल. वर्गणीच्या नावाखाली नाहक त्रास देणाऱ्या मंडळांचे परवाने रद्द करू, असेही ते म्हणाले.

सचिन निवंगुणे म्हणाले, “व्यापाऱ्यांनी एकी वाढवली पाहिजे. सर्व पोलिसांवर न ढकलता आपण सर्वांनी सतर्क राहायला हवे.” “आम्ही वर्गणीला कधीच नाही म्हणत नाही मात्र, गुन्हेगारीच्या मार्गाने खंडणी वसूल करणाऱ्यांना कधीही माफ करणार नाही, असे संतोष चौधरी म्हणाले.

सभेला शहरातील तसेच वडारवाडी, शिवाजीनगर, औंध, पाषाण, बालेवाडी, बाणेर या भागातील संघटनेचे पदाधिकारी सुमारे पाचशेहुन अधिक व्यापारी उपस्थित होते. श्री आई माता मंदिर काळेवाडी कमिटीचे उपाध्यक्ष लालचंद काग यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. हिम्मत भाटी, सुरेश चौधरी, रमेश गेहलोत, केसाराम चौधरी, भुराराम भाटी, राजू चौधरी, रमेश घांची यांनी संयोजन केले. संघटनेचे उपाध्यक्ष सोमाराम राठोड यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like