Warje : वारजे माळवाडीचे रुग्णालय पाडून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या भूमिपूजनाची घाई कशासाठी? – मुकुंद किर्दत

एमपीसी न्यूज – वारजे माळवाडीमधील पुणे महानगरपालिकेचे कै. अरविंद बारटक्के रुग्णालय पाडून, त्या ठिकाणी बांधण्यात येणार असलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे घाई घाईने भूमीपूजन कशासाठी? असा सवाल आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केलाय. काल रविवार दि.10 मार्च 2024 सकाळी याचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

याबाबत बोलताना मुकुंद किर्दत यांनी म्हटलंय की, सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी महापालिकेची असताना महापालिका अंदाजपत्रकात त्यासाठी तरतूद करत नाही. मात्र एका ठेकेदार कंपनीच्या 360 कोटी रुपयांच्या कर्जाला जामीनदार रहायचे औदार्य दाखवत आहे, हा शिंदे – फडणवीस सरकारचा कारभार संशयास्पद आहे. 350 बेड्सच्या हॉस्पीटलमधील केवळ 10 टक्के बेडस् अर्थात 35 बेडस् महापालिकेला उपलब्ध होणार आहेत.

Pune : पुण्याचा पारा 36 अंशावर,  पुढील तीन दिवसांत पारा वाढण्याची शक्यता

महापालिकेची जमीन आणि ठेकेदाराच्या 360 कोटी रुपयांच्या कर्जाच्या तुलनेत, परतावा व जोखीम पाहता ही संख्या अगदीच नगण्य असून, ठेकेदाराच्या हिताची आहे. महापालिकेने यापुर्वी उभारलेल्या हॉस्पीटलच्या इमारती धुळखात पडून आहेत. जी हॉस्पीटल खाजगी संस्थांना चालविण्यास दिली आहेत. त्याठिकाणी किती पुणेकरांवर मोफत अथवा सीएचएस दराने उपचार झाले, याची जाहीर माहिती पालिकेकडून कधी जाहीर केली जात नाही.

अशा परिस्थितीत नियोजीत हॉस्पीटलकडून सेवा मिळणार काय? असा सवाल उपस्थित करताना, हे घाईने भूमिपूजन कशासाठी? हा करार तीस वर्षाचा करण्याचा असल्यामुळे याचे दीर्घकालीन तोटे पुणेकरांना होणार आहेत. जनतेला काहीही फायदा नसलेले परंतु जनतेच्या पैशावर खाजगी सेवा देणारे हे हॉस्पिटल उभे करण्यामध्ये आणि तेही लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घाईने करण्यामागे काय कारण आहे? हॉस्पिटल ‘ बांधा वापरा ‘ तत्वावर मात्र त्यांच्या कर्जाला महानगर पालिका जामीनदार! असा अजब कारभार युतीचे राज्य सरकार आणि मनपा करते आहे! कुणाच्या हितासाठी चालले आहे हे सर्व? कोण आहे हा कंत्राटदार ? असाही सवाल आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी उपस्थित केलाय.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.