PCMC : फेब्रुवारीतच पाणीटंचाई! गृहनिर्माण सोसायट्यांना मागवावे लागताहेत टँकर

एमपीसी न्यूज – मागील साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जात असलेल्या पिंपरी-चिंचवडकरांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. वाकड, निगडी, भोसरी भागात पाण्याची समस्या जाणवत आहे. गृहनिर्माण सोसायटी धारकांना पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत. त्याचा आर्थिक बुर्दंड सहन करावा लागत आहे. (PCMC) आत्ताच पाण्याची परिस्थिती अशी असेल तर एप्रिल-मे मध्ये काय परिस्थिती होईल, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, निघोजे बंधा-यातून पाणी उचलण्याचे सर्व काम पूर्ण झाले असून केवळ उद्घाटनामुळे रखडले आहे.

तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी समन्यायी पाणी वाटपाचे कारण देत 25 नोव्हेंबर 2019 पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला होता. त्याला साडे तीन वर्षे पूर्ण होत आले. तरी, दिवसाआडच पाणीपुरवठा सुरु आहे. साडेतीन वर्षात महापालिका नव्याने पाण्याचा स्त्रोत निर्माण करु शकली नाही.

दिवसाआड पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून 100 एमएलडी पाणी उचलण्याचे नियोजन आहे. त्याकरिता निघोजे बंधारा येथे अशुद्ध जलपसा केंद्र उभारले आहे. त्यासह चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे. पण, पाणी उचलण्यास सुरुवात केली नाही. उद्घाटन रखडले आहे.  महापालिका पवना धरणातून दिवसाला 510 एमएलडी पाणी उचलत आहे.

उद्घाटनाची प्रतीक्षा न करता निघोजे बंधा-यातून पाणी उचला – सांगळे

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले, ”सध्या काही गृहनिर्माण सोसाट्यांमध्ये पाण्याची थोडी समस्या जाणवू लागली आहे. काही सोसाट्यांमध्ये एक ते दोन पाण्याचे टँकर मागवले जात आहेत. पण, मार्च, एप्रिल मध्ये पाणी समस्या जाणवेल.(PCMC) बोअरवेल कोरडे पडल्यानंतर पाणी समस्या तीव्र होते. आंद्रा धरणातून पाणी उचलणे कशासाठी अडले.

लवकरात लवकर निघोजे बंधा-यातून पाणी उचलले पाहिजे. उद्घाटनाची प्रतीक्षा न करता निघोजे बंधा-यातून पाणी उचलावे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा करावा. जेणेकरुन मार्च, एप्रिलमध्ये पाणी समस्या तीव्र होणार नाही”.

 5 फेब्रुवारी पासून 15 टँकर दिवसाला मागवावे लागताहेत – देशमुख

पिंपरी-चिंचवड को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष दत्ता देशमुख म्हणाले, ”महापालिका चोवीस तास पाणीपुरवठा करु शकली नाही. त्याउलट मागील साडेतीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. त्यातही अतिशय कमी प्रमाणात पाणीपुरवठा केला जात आहे. सोसायट्यांमध्ये पाणी साठवण क्षमता नसल्याचे कारण दिले जाते. उन्हाळ्याला सुरुवात होताच शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना दिवसाला 5 पासून 15 पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत”.

”शहराची लोकसंख्या 30 लाख ग्राह्य धरली. तरी, एका मानसाला दरदिवसाला 160 ते 170 लीटर पाणी मिळाले पाहिजे. पण, आत्ता 50 लीटरही पाणी मिळत नाही. मग, महापालिका उचलत असलेले 510 एमएलडी पाणी कुठे जाते. 40 टक्के पाणी गळती असल्याचे सांगितले जाते. मग, पालिका प्रशासन काय करत आहे. वाढीव 100 एमएलडी पाणी उचलले सांगितले जाते.

Pune Bye-Election : नाना पटोले यांच्या विनंतीवरून बाळासाहेब दाभेकर यांनी अखेर उमेदवारी अर्ज घेतला मागे

पण, ते पाणी वितरित करण्यासाठी पालिकेकडे यंत्रणा आहे का, पालिका पाण्याचे नियोजन करत नाही. सोसायट्यांना पाणी वाचविण्यास सांगितले जाते. सोसायट्यांना 5 पासून 15 टँकर दिवसाला मागवावे लागत आहेत. 200 सदनिका असलेल्या सोसायटीला 5 टँकर लागत आहेत. 1 टँकरचा खर्च हजार रुपये येतो.(PCMC) दिवसाला 5 हजार रुपये एका सोसायटीला येत आहे. जास्तीचा बुर्दंड सोसाट्यांना सहन करावा लागत आहे. महापालिकेने कर घ्यावा. पण, त्याप्रमाणे सुविधा द्याव्यात”, असेही ते म्हणाले.

महापालिका पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”महापालिका पवना धरणातून दिवसाला 510 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 असे 540 एमएलडी पाणी उचलते. पाणी उचलण्यात कोणतीही कपात केली नाही. अजून उन्हाळा सुरु झाला नाही. तक्रारींची दखल घेवून काय समस्या येत आहेत, हे तपासले जाईल”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.