Vadgaon Maval News : नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या ढोरे दांपत्याचे वडगावात जंगी स्वागत

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील ज्ञानेश्वर बाबुराव ढोरे आणि त्यांच्या पत्नी शकुंतला ज्ञानेश्वर ढोरे या दांपत्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. 126 दिवसात तीन हजार 600 किलोमीटर अंतर पायी चालत पूर्ण करून हे दांपत्य वडगाव मावळ येथे दाखल झाले. वयाच्या सत्तरीत असलेल्या या दांपत्याने नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल वडगाव मावळ येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सत्कार, मिरवणूक, रांगोळीच्या पायघड्या घालत वडगावकरांनी ढोरे दांपत्याचे स्वागत केले.

ग्रामदैवत श्री पोटोबामहाराज मंदिरामध्ये देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, विश्वस्त गणेश अप्पा ढोरे, हभप मंगलमहाराज जगताप यांच्या हस्ते सन्मान करून ढोरे दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मावळचे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सोपानराव ढोरे, दीपक बवरे, मनोज ढोरे, अनिल गुरव,मावळ तालुका दिंडी समाजाचे सेक्रेटरी हभप तुकाराम गाडे आदी उपस्थित होते.

येथील टाटा मोटर्समधील सेवा निवृत्त कर्मचारी ज्ञानेश्वर (माऊली) बाबुराव ढोरे व त्यांच्या पत्नी शकुंतला ज्ञानेश्वर ढोरे यांनी पायी नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प केला होता. 126 दिवस सुमारे तीन हजार 600 किलोमीटर पायी प्रवास करून नर्मदा परिक्रमा पूर्ण केली.

पोटोबामहाराज मंदिरापासून त्यांच्या घरापर्यंत भजन लावून मिरवणूक काढण्यात आली, घराजवळ काढण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक रांगोळीच्या पायघड्यावरुन त्यांनी घरामध्ये प्रवेश केला. तब्बल 126 दिवसांचा पायी प्रवास करून परतलेल्या ढोरे दाम्पत्याला पाहून वडगावकरांच्या भावना अनावर झाल्या.

दरम्यान, माजी राज्यमंत्री संजय भेगडे, भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांच्यासह अनेकांनी ढोरे दाम्पत्याचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. त्यांच्या या एवढ्या वयात पायी तिर्थयात्रा करून आल्याने जिद्दीचे कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.