Pimpri : युतीच्या उमेदवारांसमोर आघाडीतून कोणाचे असणार आव्हान?

एमपीसी न्यूज – विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीने पिंपरी-चिंचवड शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केले आहेत. तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस -काँग्रेस आघाडीने अद्यापही आपले उमेदवार जाहीर केले नाहीत. त्यामुळे युतीच्या उमेदवारांसमोर आघाडीतून कोणाचे आव्हान असणार याकडे शहरवासियांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

युतीने उमेदवारांची यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे. युतीकडून तीनही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पिंपरी मतदारसंघातून शिवसेनेने आमदार गौतम चाबुकस्वार यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने चिंचवडमधून आमदार लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून आमदार महेश लांडगे यांना आज (मंगळवारी) उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता आघाडीच्या उमेदवारांची प्रतिक्षा लागली आहे. आघाडीची उमेदवार यादी उद्या (बुधवारी) जाहीर होण्याची शक्यता आहे.

पिंपरीतून शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांच्यासमोर आघाडीकडून कोण लढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादीकडून चार ते पाच जण उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारी पडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चिंचवड मतदारसंघातून भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोर राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी पाच जण इच्छुक आहेत. त्यापैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारी पडते आणि जगताप यांच्यासमोर कोण उभे राहते हे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भोसरी मतदारसंघातून आमदार महेश लांडगे यांच्यासमोर राष्ट्रवादीकडून लढविण्यासाठी दत्ता साने इच्छूक आहेत. परंतु, राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे हे अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे भोसरीत लांडगे यांच्यासमोर लांडे आणि साने यांचे आव्हान राहण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.