सरकारवर नागरी संघटनांचा अंकुश हवा, मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली – महेश झगडे  

पुणे महानगर परिषद’ आयोजित ’ऑन लाईन’ औषध विक्री-योग्य की अयोग्य' विषयावरील चर्चासत्रला चांगला प्रतिसाद

एमपीसी न्यूज – भारतातातील औषध बाजार हा 1 लाख 20 हजार कोटींचा असून जनतेकडून मागणी नसताना ऑनलाईन औषध विक्री कशाला आणली? असा सवाल अन्न आणि औषध प्रशासनाचे निवृत्त आयुक्त महेश झगडे  यांनी विचारला आहे.

पुणे महानगर परिषद आयोजित ऑन लाईन’ औषध विक्री – योग्य की अयोग्य विषयावरील चर्चासत्र उत्साहात पार पडले. या चर्चासत्रात झगडे बोलत होते. यावेळी  हदयरोग तज्ज्ञ डॉ. ऋतुपर्ण शिंदे, जनरल प्रॅक्टीशनर डॉ. चंद्रकांत परुळेकर, सायबर क्राईम प्रमुख राधिका फडके, औषध विक्रेता राष्ट्रीय संघटना सदस्य वैजनाथ जागुष्टे, औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील, ग्राहक पेठ कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ऑनलाईन औषध विक्रेते ईझी फार्माचे संचालक अनिकेत बोरा, आऊटसोर्सिंग प्रायव्हेट एस. वाय.एस. लॉजिक लिमिटेडचे संचालक समीर गोडबोले, चर्चासत्राचे  संयोजन समिती सदस्य अ‍ॅड. गणेश सातपुते, महेश पाटील, संतोष पाटील, किरण बराटे, योगेश खैरे,  केदार कोडोलीकर, संजय दिवेकर, अनिरुद्ध खांडेकर, दत्तात्रय जगताप, अ‍ॅड. राजेश तोंडे आदी उपस्थित होते.

महेश झगडे म्हणाले, औषध विक्री आणि त्याबाबाबतचे कायदे चांगले आहेत पण त्याची अंमलबजावणी होत नाही. ऑनलाईन औषध विक्रीला परवानगी देण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. गुटखा वाईट असून तो कर्करोगाला कारणीभूत ठरू शकतो, हे कळायला 30 वर्षे गेली, ऑनलाईन औषध विक्रीच्या बाबतीत 30 वर्षांनी तसेच काही दुष्परिणाम ऐकायला मिळाल्यास तेव्हा काय करणार? कोटयावधी प्रिस्क्रिप्शन ऑनलाईन कशी तपासणार? या प्रश्नी औषध विक्रेत्या संघटना, नागरिक, ग्राहक संघटना उशिरा जाग्या झाल्या असून रुग्णांच्या बाजूने लढणाऱ्या संघटनांची तर वानवाच आहे ‘अशी खंत झगडे यांनी व्यक्त केली. हे चर्चासत्र उच्चस्तरीय सरकारी आस्थापनांनी का आयोजित केले नाही ? असा सवालही त्यांनी केला . अन्न आणि औषध प्रशासन तसेच संबंधित सरकारी संस्था या विकलांग झालेल्या संस्था आहेत, असेही ते म्हणाले.

औषध विक्रेता महाराष्ट्र संघटना संघटक सचिव मदन पाटील म्हणाले, समाजाचे आरोग्य ऑनलाईन औषध विक्री मुळे बिघडणार असून यासंबंधी औषध विक्रेत्यांचा २८ तारखेचा बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले.

सूर्यकांत पाठक म्हणाले, ऑनलाईन विक्रीच्या निमित्ताने परकीय कंपन्या मोठ्या प्रमाणात आक्रमण करीत असून मूठभरांच्या हातात तसेच अंबानी -अदाणींच्या हातात सर्व सत्ता द्यायची आहे का ? त्यातून त्यांनी पुढे किमती वाढविल्यास कोण रोखणार ? ऑनलाईन मुळे  बेरोजगारीही वाढेल याचा धोका आहे.

डॉ . ऋतुपर्ण शिंदे म्हणाले, फार्मासिस्ट हे व्यावसायिक तज्ज्ञ असतात त्यामुळे त्यांच्यावर भरवसा ठेवता येतो. मात्र, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन ला चोरूनही ऑनलाईन खरेदी शक्य असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. ऑनलाईन खरेदीतून रुग्णाला कमी पैशात औषधे मिळणार असतील तर विरोध नाही मात्र त्यांची विश्वासार्हता तपासावी लागणार आहे.

ऑनलाईन औषध विक्री प्रतिनिधी अनिकेत बोरा म्हणाले, ज्या ग्राहकांना जुनाट विकार आहेत आणि दरमहा ठरलेली औषधे घ्यावी लागतात, अशाना ऑनलाईनचा फायदा होऊ शकतो. खात्रीने, ठरलेल्या वेळी औषधे मिळतील. ऑनलाईन विक्रेते देखील शासनाकडूनच प्रमाणित असतात आणि प्रशिक्षित असतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

वैजनाथ जागुष्टे म्हणाले, तातडीच्या औषध सेवेसाठी शेजारच्या औषध विक्री दुकानाशिवाय पर्याय नाही. ऑनलाईन विक्रेते बेकायदेशीरपणे विना प्रस्क्रिप्शन औषधे भरमसाठ सवलतीत विकण्याची श्यक्यता नाकारता येत नाही.

‘पुणे महानगर परिषद‘चे निमंत्रक अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी प्रास्ताविक केले. महेश महाले यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.