PCMC : जलपर्णी न काढता पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर आता तरी कारवाई होणार का? –  राहूल कोल्हटकर

एमपीसी न्यूज – पवना, इंद्रायणी नदीतील जलपर्णी काढण्यासाठी चार कोटी रुपयांचे टेंडर निघाले, कामाची मुदत संपली पण पवना , इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी अजून निघाली नाही. पावसामुळे पाण्याच्या प्रवाहाने जलपर्णी वाहून गेली आहे. त्यामुळे जलपर्णी न काढता  पैसे घेणाऱ्या ठेकेदारांवर आता तरी कारवाई होणार का? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते  राहूल कोल्हटकर यांनी केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात कोल्हटकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरातून मुळा , पवना ,इंद्रायणी या नद्या वाहतात. नदी प्रदूषणाचा प्रश्न तर मोठा आहेच. त्यावर योग्य निर्णय, नियोजन , उपाययोजना करणे गरजेचे आहे. याकरिता महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करत आहे.

Pimpri Chinchwad : शहरात चोरीच्या चार घटना; पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

पण, नद्या प्रदूषण मुक्त अजूनही झाल्या नाहीत. अनेक ठिकाणी योग्य पाहणी केली. तर, सांडपाणी नदीत सोडल्याचे लक्षात येईल. जलपर्णी काढण्यासाठी  कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढण्यात येते. पण त्यावर योग्य काम होते का नाही हे महापालिका प्रशासन यांच्या वतीने पाहण्यात येत नाही. जानेवारी ते मार्च दरम्यान टेंडर प्रक्रिया राबवण्यात येते. पावसाळ्याच्या आधी हे काम होणे आवश्यक आहे.

पण, ठेकेदार पावसाची वाट पाहण्यात मग्न असतात. कारण पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की जलपर्णी काढावी लागत नाही. तर, ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाते. त्यामुळे काम करण्याची गरज पडत नाही. पण, पुणे हद्दीत या जलपर्णीला अटकाव केल्याने ती संगम पुलाच्या जवळ अडकून पडते आणि असे हिरवळ आलेली नदी दिसून प्रदूषणात वाढ होते.

अशा जलपर्णीयुक्त नद्या आपणास सद्या पाहण्यात येत आहेत. दरवर्षी हीच ओरड आहे की कोट्यवधी रुपयांचे टेंडर निघून सुद्धा जलपर्णी काढण्यात का येत नाही ? मनपा प्रशासन यांना हे दिसत का नाही ? प्रशासकीय राजवटीत काम चोख व योग्य पद्धतीने करण्यात येईल ही अपेक्षा होती. पण, नदी पात्रातील दृश्याने प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला. नेहमीचा कित्ता यावर्षी ही ठेकेदारांच्या वतीने राबविण्यात आला. पण मनपा प्रशासन यांनी ही नेहमी प्रमाणे याकडे कानाडोळा केला आणि करदात्याच्या पैशावर पुन्हा दरोडा टाकण्याचे काम करण्यात आले.

महापालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन कामाचे आदेश दिले. पण प्रत्यक्षात जलपर्णी  काढली नाही. अनेक नदीपात्रातील नद्यातील जलपर्णी अजून निघाली नसल्याने संबंधित कामाची पाहणी व चौकशी करण्यात यावी.

पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता दिलेले काम संबंधित ठेकेदार यांनी केले नसल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करून त्याचे बिल थांबण्यात येऊन सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. जलपर्णी काढण्याकरिता दिलेल्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक किंवा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.