Pune News – ‘अभंग प्रभू’ यांच्या साथीने रिक्षाचालकाचा ‘राज’ होणार डॉक्टर

एमपीसी न्यूज – वडील रिक्षाचालक… आई अंगणवाडी सेविका… मनाशी डॉक्टर होण्याची जिद्द… वर्षभर घेतलेले कठोर परिश्रम… डॉ. अभंग प्रभू यांचे (Pune News) मिळालेले मार्गदर्शन… एमबीबीएसला प्रवेश मिळवण्याचे पूर्ण झालेले स्वप्न… आणि कष्टकरी आई-वडिलांसह त्याच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद… ही गाथा आहे रिक्षाचालकांचा मुलगा असलेल्या राज गजानन दामधर याची. आता राज अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीच्या साथीने डॉक्टर होणार आहे.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अकॅडमीचे (एपीएमए) संस्थापक संचालक आणि प्रसिद्ध प्रसूतिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अभंग प्रभू यांनी वर्षभरापूर्वी राज दामधर याची आर्थिक परिस्थिती समजून घेत एका अटीवर प्रवेश दिला. 50 हजारांची अनामत रक्कम ठेवायची आणि सचोटीने अभ्यास करून ‘नीट’ परीक्षेत 600 पेक्षा अधिक गुण मिळवून ती रक्कम परत मिळवायची अशी ती अट होती. राजने डॉ. प्रभूंचा विश्वास सार्थ ठरवत ‘नीट’ परीक्षेत 607 गुण मिळवले.

डॉ. प्रभू यांनी ठरल्याप्रमाणे अनामत रकमेचा धनादेश परत करण्यासह त्याचे एमबीबीएसचे चारही वर्षांचे शुल्क भरण्याचे ठरवले. त्याचा धनादेश त्यांनी शुक्रवारी राज व त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केला. तसेच राज यांच्यासह अकॅडमीतील अन्य 20 यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रसंगी त्याचे वडील गजानन दामधर, आई प्रमिला दामधर, ‘एपीएमए’चे संचालक प्रा. सचिन हळदवणेकर, संचालिका डॉ. हिमानी तपस्वी, समुपदेशिका डॉ. शीतल श्रीगिरी, डॉ. राजेश देशपांडे आदी उपस्थित होते. प्रसंगी डॉ. प्रभू यांनी यावर्षीपासून तीन गरीब व गरजू मुलींना एमबीबीएसच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणा केली.

डॉ. अभंग प्रभू म्हणाले, “गेल्या 22 वर्षांपासून ‘एपीएमए’ डॉक्टर घडविण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे. मुंबई, सांगली आणि पुण्यात ‘एपीएमए’ कार्यरत आहे. पुणे शाखेत जवळपास 750 विद्यार्थी ‘नीट’ परीक्षेसाठी मार्गदर्शन घेत आहेत. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरकी करणारे, तसेच तज्ज्ञ शिक्षक येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. एमबीबीएसला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रमाण ही ‘एपीएमए’ची खासियत आहे. राज यांच्याप्रमाणेच (Pune News) गरीब व गरजू मुलींना प्रोत्साहन व आधार देण्यासाठी यंदा तीन मुलींच्या एमबीबीएसची फी ‘एपीएमए’ भरणार आहे.”

राज रामधर याने डॉ. अभंग प्रभू व इतर शिक्षकांचे आभार मानले. राज म्हणाला, “माझे मुळगाव बुलढाण्यातील संग्रामपूर आहे. वडिलांचे बीएस्सी, तर आईचे 12 वीपर्यंत शिक्षण झाले आहे. मोठ्या भावाने डीफार्मसी केले आहे. मात्र, नोकरी नाही. पुण्यात आंबेगाव पठार येथे राहत असून, वडील गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवत आहेत.

आई खासगी अंगणवाडीत सेविका आहे. गेल्या वर्षी आर्थिक परिस्थितीमुळे गावी क्लासेस लावले व मेहनत केली. पण थोडक्या मार्कांवरून एमबीबीएस हुकले. ‘नीट’ पुन्हा देण्यासाठी व तयारीसाठी ‘एपीएमए’कडे आलो. इथली फी माझ्या आवाक्याबाहेर होती. त्यावेळी डॉ. प्रभू सरांना माझी आर्थिक परिस्थिती सांगितली. सरांनी माणुसकीच्या जाणिवेतून मला सहकार्य केले.

Pimpri Chinchwad : शहरात चोरीच्या चार घटना; पावणे चार लाखांचा ऐवज लंपास

फी न भरता मला वर्षभर क्लासेस करता आले. उत्तम मार्गदर्शन व अभ्यासातील सातत्य याच्या जोरावर मला 607 गुण मिळाले. एमबीबीएसच्या खर्चासाठी ‘एपीएमए’ अर्थसहाय्य करणार आहे, याचा मला खूप आनंद झाला असून, याची जाणीव ठेवून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून डॉक्टर होणार आहे. सामाजिक जाणिवेतून डॉक्टरकी करण्याचे आश्वासन देतो.”

डॉ. हिमानी तपस्वी म्हणाल्या, “डॉक्टर होण्याची जिद्ध उराशी बाळगून, मेहनतीने व आम्ही केलेल्या मार्गदर्शनानुसार चांगला अभ्यास करत वैद्यकीय प्रवेश मिळवणाऱ्या राजची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. नैराश्याने ग्रासलेल्या, आई-वडिलांकडून सगळ्या गोष्टी मिळूनही एकाकी झालेल्या मुलांना राजप्रमाणे मेहनतीने यश मिळवायला हवे.”

शिष्यवृत्तीसाठी पात्र मुलींकडून अर्ज मागविण्यात येणार असून, त्यातून तीन मुलींची निवड केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी [email protected] या ईमेलवर किंवा 8591502291 व 9822378505 या मोबाईलवर संपर्क करावा, असे डॉ. अभंग प्रभू यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.