Pune City Crime News: चार महिन्याच्या बाळाच अपहरण करणार्‍या महिलेला अटक

बाळ सुखरूप

एमपीसी न्यूज : हडपसर परिसरातून चार महिन्याच्या बाळाचे बुधवारी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. अपहरण करणाऱ्या महिलेला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाळ सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अरुणा राजेंद्र पवार (वय 22) असे आरोपी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका 23 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली होती

 

फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. आणि याच भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीने चार महिन्याचा बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणी गावातील असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरू केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली. काही वेळाने  महिलेने फिर्यादी यांच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या.

 

स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही. बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला होता.

 

आरोपी महिला ही पुण्यातील मगरपट्टा सिटी परिसरात वास्तव्यास आहे. मिळेल ती कामे करून ती उदरनिर्वाह करते. तिने या बाळाचे अपहरण का केले होते त्याचा तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.