Pimpri : प्रगतीच्या दृष्टीने स्त्री ही स्त्रीची मैत्रिण असणे आवश्यक – अपर्णा डोके

एमपीसी न्यूज –  आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे, अशक्त नसून  सशक्त आहे. प्रत्येक क्षेत्रात स्त्री सक्षमतेने आपली प्रतिमा उंचावते असून स्पर्धेच्या युगात  एक सक्षम स्त्री दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण असेल तर सक्षमता दुप्पट होइल म्हणून स्त्री ही स्त्रीची मैत्रिण असणे प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक आहे असे प्रतिपादन पिंपरी  चिंचवडच्या माजी महापौर अपर्णा डोके यांनी केले. महाराष्ट्र  साहित्य  परिषद पिंपरी  चिंचवडच्या विशेष महिला पुरस्कार समारंभात त्या बोलत होत्या.

यावेळी नगरसेविका भारती  फरांदे, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष  विनीता  ऐनापुरे, डॉ. रजनी शेठ उपस्थित होते.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम  करणाऱ्या महिलांना विशेष महिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह, नारळ,  फूल आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यामध्ये अध्यात्म  क्षेत्रासाठी शैलजा कुलकर्णी, उल्का खळदकर. साहित्य क्षेत्रासाठी मीना शिंदे, सरला मुनोत. कला क्षेत्र इला पवार, केतकी वाडेकर. वैद्यकीय क्षेत्र डॉ. अलका भळगट, डॉ. नीलम ढमाले. सामाजिक क्षेत्र नीता परदेशी, सुप्रिया सोळांकूरे. शैक्षणिक क्षेत्र अपर्णा पांडे, हर्षिता वाच्छानी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी मयुरी लाटकर, श्वेता पाटील  या कर्तुत्ववान महिलांना विशेष महिला पुरस्कार प्रदान करून गौवरवण्यात आले.

कार्यक्रमाची सुरूवात प्रसिद्ध नृत्यांगना रोशन दाते यांच्या शिष्या केतकी वाडेकर हिच्या  दुर्गा माता आणि प्रल्हाद कथेवर आधारित भरत नाट्यम सादरीकरणाने झाली. किरण लाखे यांची संहिता व निवेदन असलेल्या “स्त्री संवेदना” या विषयावर  मंगला पाटसकर, मुक्ता सोहोनी आणि प्राची कुलकर्णी यांनी अभिवाचन करून स्त्री संवेदनातील विविध पदर उलगडले.

विनीता ऐनापुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संजय जगताप, जयश्री श्रीखंडे, सीमा गांधी, वर्षा धारणे, अश्विनी कुलकर्णी, विनिता श्रीखंडे, अंजली कुलकर्णी, मंजिरी कुलकर्णी, बी. एस बनसोडे यांनी संयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. समिता टिल्लू यांनी केले तर डॉ. रजनी शेठ यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.