Pimpri : गॅस शेगडी दुरुस्त करणा-या दुकानदारांकडे छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खंडणी मागितल्याचा शिव व्यापारी सेनेचा आरोप

खंडणी मागणा-या मुजोर कार्यकर्त्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी; शिव व्यापारी सेनेची वाकड पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी

एमपीसी न्यूज – छावा संघटनेचे कार्यकर्ते व तथाकथित स्वयंघोषित पुढारी पिंपरी-चिंचवड शहरातील गॅस शेगडी दुरुस्त करणा-या दुकानदारांकडे वेळोवेळी खंडणीची मागणी करतात. तसेच दुकानदारांनी खंडणी देण्यास नकार दिल्यास अन्न पुरवठा प्रशासनाला बोलावले जाते. पोलिसांना सांगून दुकानातून गैरव्यवहार चालत असल्याच्या खोट्या तक्रारी दिल्या जातात असा आरोप शिव व्यापारी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे कष्ट करून पोट भरणा-या दुकानदारांना न्याय देण्यासाठी अशा मुजोर कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. याबाबत शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेनेच्या वतीने वाकड पोलिसांना निवेदन देण्यात आले.

शिव व्यापारी सेनेच्या वतीने वाकड पोलिसांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून छावा संघटना पिंपरी-चिंचवड शहरातील गॅस शेगडी दुरुस्त करणा-या लहान दुकानदारांना खोट्या तक्रारी देण्याची धमकी देऊन दुकानदारांकडून खंडणी वसूल करण्याचे काम करतात. एखाद्या दुकानदाराने खंडणी देण्याचे अमान्य केल्यास अन्न पुरवठा प्रशासनाला खोटी पत्रे व फोन करून त्यांना बोलावले जाते. दुकानाची झडती घेऊन त्यांना नाहक त्रास दिला जातो. दुकानात काहीच नसल्याचे निष्पन्न झाल्यास तथाकथित नेते तिथून पळ काढतात.

बुधवार (दि. 28 मार्च) रोजी छावा संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष अमोल वीर व अन्य दोन साथीदारांनी तापकीरनगर चौकातील साईबाबा मंदिराजवळ असलेल्या माउली गॅस शेगडी दुरुस्ती व विक्री करणा-या दुकानदाराला कोणत्याही कारणाशिवाय पैसे मागितले. एखादा अधिकारी एखाद्या दुकानावर कारवाई करण्यासाठी जात असताना सोबत संबंधित विभागाचे अधिकारी व पोलीस असायला हवे. मात्र अमोल वीर याने असे काहीही न करता मी अधिकारी असून तुमच्या दुकानावर कारवाई करण्यासाठी आलो आहे, असे सांगून दुकानदाराला घाबरवले. दुकानदाराकडे खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यास दुकानदाराने नकार दिला, म्हणून वीर याने 100 या क्रमांकावर फोन करून पोलीस व अन्न धान्य पुरवठा विभागाला माऊली गॅस दुरुस्ती व विक्री या दुकानाची झडती घेण्यास भाग पाडले. दुकानात काहीही न आढळल्याचे दिसताच अमोल वीर व त्याच्या दोन साथीदारांनी तिथून पळ काढला.

दुकानदारांची पिळवणूक करणाऱ्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई करावी. सर्वसामान्य दुकानदारांना भयमुक्त व्यवसाय करण्यास सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील व्यावसायिकांना विनाकारण खंडणी मागणे, वेगवेगळ्या उत्सवांची जबरदस्तीने खंडणी मागणे असे प्रकार होत असतील तर अशा व्यापारी व नागरिकांनी युवराज दाखले ( 99223 73959) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन शिव व्यापारी सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.