WHO News: जगातील प्रत्येक 10 व्यक्तींपैकी एकाला कोरोना संसर्गाची शक्यता

कोरोना संक्रमणाचा आकडा प्रत्यक्षात 80 कोटींच्या जवळपास असण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.

एमपीसी न्यूज – जगातील प्रत्येक 10 व्यक्तींपैकी एकाला कोरोना संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. एका जेष्ठ अधिकाऱ्याच्या मते या अंदाजाचा अर्थ ‘जगाच्या लोकसंख्येतला एक मोठा गट धोक्यात आहे. ‘नोंदवण्यात येणाऱ्या रुग्ण संख्येपैकी प्रत्यक्षातली संख्या कितीतरी अधिक असल्याचे तज्ज्ञ दीर्घकाळापासून सांगत आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेच्या जिनिव्हामधील मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कोरोना जागतिक साथीचा जगभरातल्या देशांतून बिमोड कसा करायचा, याविषयी चर्चा झाली.
आतापर्यंत जगभरातल्या दीडशेपेक्षा जास्त देशांमधील 3.5 कोटींपेक्षा जास्त जणांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण संक्रमणाचा हा आकडा प्रत्यक्षात 80 कोटींच्या जवळपास असण्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे.

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 10 टक्के लोक आतापर्यंत या विषाणू संसर्गाच्या विळख्यात अडकल्याचा अंदाज वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या हेल्थ इमर्जन्सी प्रोग्रामचे कार्यकारी संचालक माईक रायन यांनी व्यक्त केलाय.
ते म्हणाले, हा आकडा विविध देश, शहरं आणि गावं आणि विविध समुदायांनुसार वेगवेगळी आहे. पण याचा अर्थ म्हणजे जगभरातला एक मोठा गट धोक्यात आहे. ही साथ इतक्यात जाणार नाही, हे आपल्याला माहिती आहे असं ते म्हणाले.
सगळ्या देशांमध्ये या व्हायरसचा संसर्ग झालेला असला तरी आपण हे लक्षात घ्यायला हवं की या साथीचा परिणाम काही ठिकाणी जास्त झालाय तर काही ठिकाणी कमी. संसर्गाच्या एकूण प्रकरणांपैकी 70 टक्के प्रकरणं आणि मृत्यू हे दहा देशांमध्ये नोंदवण्यात आलेले आहेत आणि एकूण प्रकरणांपैकी अर्ध्या केसेस या तीन देशांत नोंदवण्यात आलेल्या आहेत, असे जागतिक आरोग्य संघटनेचे डायरेक्टर जनरल टेड्रॉस गिब्रायसुस यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.