Kamshet : कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज – कोयत्याने वार करून तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना आज (रविवारी) पहाटे ताजे गावात घडली. याप्रकरणी कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असल्याची चर्चा मावळ परिसरात सुरु आहे.

किरण बाळू कोरडे (वय 25, रा. सज्जनवाडी, ताजे, मावळ), असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमनाथ बाळू कोरडे (वय 22, रा. ताजे मावळ) यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नितीन ज्ञानेश्वर केदारी, बाळू शंकर केदारी, नितीन अर्जुन केदारी, बबन विठ्ठल केदारी, उमेश चंद्रकांत केदारी (सर्व रा. ताजे, मावळ) व काळू बाळू पिंपळे (रा. पिंपळोली, मावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण पिंपरी येथील एका कॉफी शॉपमध्ये काम करतो. शनिवारी (दि. 1) रात्री उशिरा काम संपवून पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तो सज्जनवाडी येथील आपल्या घरी जात होता. किरण ताजे गावातील काशिनाथ केदारी यांच्या घरासमोर सर्व आरोपी थांबले होते. आरोपींनी किरणला थांबवून त्याच्या डोक्यात, चेह-यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. हा संपूर्ण प्रकार किरण याचा चुलत भाऊ अमोल कोरडे याने पाहिला. त्याने तात्काळ किरण याचा भाऊ सोमनाथ याला फोनवरून कळविले. सोमनाथ तात्काळ घटनास्थळी आला. त्यावेळी किरण रक्ताच्या थारोळ्यात गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. सोमनाथ याने किरण याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

कामशेत पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. तर अन्य तीन आरोपी अद्याप फरार आहेत. कामशेत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.