Lonavala : आता द्रुतगती मार्गावर देखील रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प?

कळंबोली भाजपाच्या सूचनेचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्वागत

एमपीसी न्यूज- घाट परिसरात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाजवळ रेन वॉटर हार्वेस्टिंग करून संचय करावे असा महत्त्वपूर्ण प्रस्ताव कळंबोली भाजपाकडून बुधवारी मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने केलेल्या या सूचनेचे प्रधान सचिव अजोय मेहता यांनी स्वागत केले. त्यांनी याबाबत अंमलबजावणी करण्याकरिता हा प्रस्ताव नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे त्वरित वर्ग केला. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरून याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. भाजपाचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांनी ही संकल्पना मांडली.

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग हा बोरघाटातून जातो. अनेक डोंगरातून बोगदे करून द्रुतगती महामार्गाला वाट करून देण्यात आली आहे. पावसाळ्यात द्रुतगती महामार्गाच्या बाजूला काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. विशेषता खोपोली खंडाळा, लोणावळा आणि काही प्रमाणात मावळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. डोंगर माथ्यावरून हे पाणी वाहत येऊन ते वाया जाते. महामार्गावर पावसाचे पाणी आल्याने लेनची ही काही प्रमाणात दुरवस्था होते.

पावसाचे प्रमाण जास्त असतानाही त्याचा काहीच फायदा होत नाही. रस्ते विकास महामंडळाने आय आर बी च्या माध्यमातून दुभाजकांवर वेगळ्या प्रकारची झाडे लावली आहेत. त्या झाडांना पावसाळ्याव्यतिरिक्त इतरवेळी टँकरने पाणी घालावे लागते. याकरीता मोठ्या प्रमाणात खर्च येतो आणि वेळही वाया जातो. इतर ठिकाणाहून पाणी आणून ही झाडे जगवावी लागतात.

या पार्श्वभूमीवर कळंबोली भाजपाकडून महामार्गालगत पडणाऱ्या पावसाचं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून ते पाणी साठवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रशांत रणवरे यांच्यासह पक्षाचे कळंबोली शहराध्यक्ष रविनाथ पाटील यांनी आपली ही संकल्पना सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर मांडली. त्यांच्या मार्गदर्शनानुसार बुधवारी रणवरे यांनी द्रुतगती महामार्गाजवळ रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याबाबतची सूचना देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडे केली. त्यानुसार प्रधान सचिव अजोय मेहता यांनी एका तासाच्या आतमध्ये या सूचनेचे स्वागत करून आपण ती नगर विकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे पाठवले असल्याचा अभिप्राय प्रशांत रणवरे यांना कळवला. त्यांनी यासंदर्भात रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी कळंबोलीच्या भाजप पदाधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क साधून ही सूचना चांगली असल्याचे सांगितले. भविष्यात हा विभाग याविषयी सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही त्यांच्याकडून देण्यात आली.

रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यामुळे जमिनीची पाण्याची पातळी वाढू शकते. द्रुतगती मार्गावर असणाऱ्या झाडांना पावसाळ्यानंतर किमान ४ महिने तरी संचय केलेले पाणी वापरता येऊ शकते. टँकरचा वापर कमी होऊन शासनाच्या महसुलात वाढ होऊ शकते. आजूबाजूच्या गावांना देखील तरतुदीनुसार नियम व अटी घालून पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. प्रत्येक १० किलोमीटरवर जमिनीमध्ये पाण्याची मोठी टाकी बांधल्यास ते पाणी द्रुतगती मार्गाला झाडांसाठी वापरले जाऊ शकते. अशा सूचना भाजपाचे कळंबोली शहर उपाध्यक्ष प्रशांत रणवरे यांच्या संकल्पनेत मांडण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.