Pune : सापा टुबिंग कंपनी कामगारांना तीन वर्षात 11 हजार रुपयांची पगारवाढ

एमपीसी न्यूज- फुलगाव येथील सापा टुबिंग पुणे प्रा लि. या कंपनीत कंपनी व्यवस्थापन आणि शिवगर्जना कामगार संघटना यांच्यामध्ये नुकताच त्रैवार्षिक वेतनकरार करण्यात आला. या करारानुसार कामगारांना 11 हजार रुपयांची भरघोस पगारवाढ देण्यात आली आहे. पहिला पगार 11 हजार रुपये असताना आता आणखी 11 हजार रुपयांची वाढ झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर करार दि. 1 एप्रिल 2019 ते ३१ मार्च 2021 या कालावधीसाठी लागू असणार आहे. या करारानुसार प्रथम वर्षासाठी 5 हजार 500, द्वितीय वर्षासाठी 2 हजार 500 तर तिसऱ्या वर्षासाठी 2 हजार 750 इतकी पगारवाढ कामगारांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे १०० टक्के फरक देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने मान्य केले आहे. या करारा अंतर्गत कामगारांना 10 हजार रुपयांचे बिनव्याजी टर्म लोन आणि प्रत्येक वर्षी 2 जोड़ गणवेश, 2 सेफ्टी शुज मिळणार आहेत. बफर पॉलिसीची रक्कम 5 लाख करण्यात आली असून 25 लाख रुपयांची विमा पॉलिसी करण्यात आली आहे.

सदर करार यशस्वी करण्यासाठी शिवगर्जना कामगार संघटनेच्या वतीने अध्यक्ष संतोष अण्णा बेंद्रे, संघटना पदाधिकारी विजय वागसकर, अक्षय पवळे,
राजेंद्र वागसकर, निलेश गाडेकर, सागर आवाळे यांनी विशेष प्रयत्न केले. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने कार्यकारी संचालक भरत बेहेल, सहाय्यक सरव्यवस्थापक संतोष हनवते, मनुष्यबळ विकास संचालक जगदीश हेगडे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. कंपनीच्या कामगारांनी पेढे वाटून जल्लोष साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.