Lonavala : राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा ते कार्ला फाटा दरम्यान काही ठिकाणी लहान मोठ्या आकाराचे खड्डे पडलेले असताना ते बुजविण्याकडे शासकीय यंत्रणांचे पुर्णतः दुलर्क्ष झाल्याने हे खड्डे अपघाताला निमंत्रण ठरु लागले आहेत.

पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील आयआरबी कंपनीचा टोल वसुलीचा व देखभाल दुरुस्तीचा ठेका संपला आहे. ठेका संपणार याची पूर्वकल्पना असल्याने कंपनीने रस्ते दुरुस्तीकडे काहीसे दुलर्क्ष केले होते. त्यातच यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने खंडाळा ते कार्ला भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविले जात नसल्याने त्यांचे आकार व प्रमाण वाढू लागले आहे.

रात्रीच्यावेळी हे खड्डे समजत नसल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. पूर्वी रस्त्यांवर खड्डे पडल्यास ते आयआरबी कंपनीकडून तात्काळ बुजविले जात होते. किंबहुना आयआरबी कंपनीला दोषी धरता येत होते. आता मात्र तक्रार कोणाकडे करायची व दोषी कोणाला धरायचे याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे. सध्याचे टोल वसुली ठेकेदार हे आमच्याकडे फक्त टोलवसुलीचा ठेका आहे असे सांगत देखभाल दुरुस्ती कामात हात वर करत आहेत.

महाराष्ट्र शासन व रस्ते विकास महामंडळ यांनी या मार्गावरील देखभाल व दुरुस्ती करिता काय उपाययोजना केल्या आहेत याबाबत माहिती प्रसिध्द करावी तसेच नागरिकांनी रस्ता दुरवस्थेबाबत कोणाकडे तक्रार करावी याबाबतची माहिती टोलनाक्यांच्या ठिकाणी जाहिरात स्वरुपात लावावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

साईड पट्टयाची झाली गाळण

रस्त्यालगतची पायी चालण्याकरिता मातीची बनविलेल्या साईड पट्टयांची अक्षरशः गाळण झाली असून याठिकाणांवर पायी चालणे नागरिकांना अवघड झाले आहे. दरवर्षी पावसाळा सुरु होण्यापूर्वी साईड लेनवर माती व मुरमाचा भराव घातला जातो. या साईड लेनवर वाहने थांबवली जातात तसेच वाहने खाली वर घेतली जातात. यामुळे मुरुमाचा गाळ होऊन मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे तसेच खड्डे पडून पाणी साचल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालत डांबरी रस्त्यावरुन चालावे लागत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.