Chinchwad: उलगडला बहिणाबाईंच्या काव्याचा खजिना

एमपीसी न्यूज – संस्कारभारती साहित्यविधा आणि चिंचवडगाव देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “कलासेवा’ कार्यक्रमात निसर्गकवी बहिणाबाईंच्या काव्यांचा खजिना उलगडला गेला.

चिंचवडगाव देवस्थान चिंचवडच्या मंगलमूर्ती वाड्यात हा कार्यक्रम पार पडला. “माजघरातील सोन्याची खाण’ हा बहिणाबाईंच्या सुंदर काव्यांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. डॉ. नयना कासखेडीकर यांसह माधुरी जोशी, गीता कोलंगडे यांनी साजेसे अभिवाचन केले. कोणत्याही संगीत साथीशिवाय सीमा भोळे यांनी गायलेल्या “लपे करमाची रेखा’, “अरे खोप्यामधी खोपा’, “बिना कपाशीन उले त्याले बोड म्हणू नये’, “माझी माय सरोसती’ अशा एकाहून एक सुरस कविता अतिशय सुरेख सादर केल्या गेल्या.

या कार्यक्रमात बहिणाबाईंच्या पणती संजीवनी चिरमाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. संजीवनी यांच्या आई-वडिलांनी बहिणाबाईंचे रहाते घर व त्यांच्या वापरातल्या वस्तु त्यांची “अमुल्य ठेव’ या भावनेने अतिशय प्रेमाने जळगावच्या घरी विशेष जतन करून ठेवल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.

पडलेल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना विशाखा कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा दामले यांनी केले. या कार्यक्रमाची संकल्पना, संशोधन, लेखन, दिग्दर्शन संस्कार भारतीच्या पश्‍चिम प्रांताच्या साहित्यविधा प्रमुख डॉ. नयना कासखेडीकर यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.