Dighi : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक; चार पिस्तुलासह 15 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन देशी बनावटीचे कट्टे आणि 15 जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 27 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सिद्धार्थ उर्फ रोनक रिपुरमन शर्मा (वय 22, रा. लक्ष्मीनगर, दिघी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस शिपाई त्रिनयन संजय बाळसराफ यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिघी येथी मॅगझीन चौकात एक तरुण पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सिद्धार्थ याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन देशी बनावटीचे कट्टे आणि 15 जिवंत काडतुसे मिळून आली.

बाबा पांडे आणि सॉंडी गुप्ता या दोघांच्या सांगण्यावरून पिस्तूल विक्रीसाठी आल्याचे सिद्धार्थ याने पोलिसांना सांगितले. बाबा पांडे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी आहे. मागील काही दिवसांपासून तो फरार आहे. पोलिसांनी सिद्धार्थकडून 1 लाख 27 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त करत त्याला अटक केली. त्याच्यावर शस्त्र अधिनियम कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

सहाय्यक पोलीस आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस कर्मचारी राहुल खारगे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, सचिन मोरे, जमीर तांबोळी, योगेश आढारी, नाथा केकाण, अरुण नरळे, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचीम, राजकुमार हनुमंते, सागर जैन यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.