Pimpri : शहरात पोलिसांची 31 ठिकाणी नाकाबंदी ; 246 गुन्हेगारांची तपासणी

एमपीसी न्यूज- आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी (दि. 19) “ऑपरेशन ऑल आऊट’ कारवाई दरम्यान पोलिसांनी शनिवारी जोरदार कारवाई केली. शहरात तब्बल 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच ठिकठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करीत 245 गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.

आगामी निवडणूका भयमुक्‍त वातावरणात पार पडाव्यात यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलीस आयुक्‍त संदीप बिष्णोई आदेशानुसार आत्तापर्यंत 42 ठिकाणी कोम्बिग ऑपरेशन करण्यात आले आहे. मात्र शनिवारी एकाच दिवशी पोलिसांनी जोरदार कारवाई केली. प्रचार संपल्यावर पैसे वाटप केले जात असल्याच्या तक्रारी येतात. वाटपासाठी पैशाची ने-आण होऊ नये म्हणून शहरी भागात अचानक 31 ठिकाणी नाकाबंदी केली. तसेच झोपडपट्टी भागात कोम्बिग ऑपरेशन करीत 246 गुन्हेगारांची पुन्हा तपासणी केली. मिळालेल्या सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात आणून बसवून ठेवण्यात आले. यामुळे शहरातील गुन्हेगारांची एकच पळापळ झाली.

म्हाळुंगेत हातभट्टी उद्धवस्त

अमली पदार्थ विरोधी पथकाने म्हाळुंगे पोलीस चौकीच्या हद्दीत हातभट्टी जेसीबीच्या साहाय्याने उद्धवस्त केली असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिली. या कारवाईमध्ये आठ लाख 45 हजार रुपयांची दारू आणि रसायन नष्ट करण्यात आले.

आळंदीत कारवाई

आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने दारूच्या दोन हातभट्ट्या उद्धवस्त करीत एक लाख 32 हजार रुपयांचा दारू आणि रसायनाचा साठा नष्ट केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोटारीसह दारू जप्त

गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने आठ लाख रुपयांची एमएच-14-एफएस-6090 या इनोव्हा मोटारीतून 14 हजार 706 रुपयांची देशी, विदेशी दारू हस्तगत केली. या गुन्ह्यात पोलिसांनी एकूण आठ लाख 14 हजार 706 रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

भोसरीत गुन्हे शाखेची कारवाई

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी दारूच्या वाहतूकीबाबत गुन्हे दाखल केले असून त्यातून एक लाख 15 हजार 892 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.