Pune : बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी सराईत गुन्हेगारास अटक

एमपीसी न्यूज- बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरातील बकुळ हॉलसमोर बुधवारी (दि. 20) ही कारवाई करण्यात आली.

उमेश रमेश कोकाटे (वय 34 वर्षे रा.पोकळे वस्ती, बिबवेवाडी) असे या प्रकरणी अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात आर्म्स ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुन्हे शाखा युनिट 3 चे पथक बिबवेवाडी परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक सचिन जाधव व इम्रान शेख यांना कोकाटे यांच्याकडे बेकायदेशीर पिस्तूल असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी कोकाटे याला बिबवेवाडी येथील बकुळ हॉल समोर पकडून त्याच्याकडील गावठी देशी बनावटीचे पिस्तूल व 4 जिवंत काडतुसे असा एकूण 50 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उमेश कोकाटे याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात वाहन चोरी, जबरी चोरी, दरोड्याची तयारी व आर्म्स ऍक्ट नुसार एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस उपनिरीक्षक उत्तम बुदगुडे, सहायक फौजदार वसावे, पोलीस नाईक सचिन जाधव, इम्रान शेख, सुधीर माने, पोलीस शिपाई गजानन सोनुने, तुषार माळवदकर यांनी केली. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.