बुधवार, ऑक्टोबर 5, 2022

घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार गजाआड; 14 गुन्हे उघड

11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज जप्त; निगडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घरफोडी करणा-या दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई शुक्रवारी (दि.3) शाहूनगर, चिंचवड येथे करण्यात आली. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, निगडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, शंकर आवताडे यांनी याबाबत माहिती दिली. 

विकास सुनील घोडके (वय 21, रा. खराडी, पुणे) आणि निखील दत्तात्रय गंगणे (वय 23, रा. मोरे वस्ती, चिखली) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

निगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार विकास हा वॅगनर मोटारीसह शाहूनगर येथे आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास याला (एमएच 12 ई एम 1849) या मोटारीसह ताब्यात घेतले. त्याच्याकडे घरफोडीविषयी चौकशी केली असता एक महिन्यापूर्वी तुळजाई वस्ती, आकुर्डी येथे घरफोडी केल्याची त्याने कबूली दिल्याचे, पोलिसांनी सांगितले.

अटकेत असताना पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. साथीदार निखील गंगणे याच्यासह निगडी आणि पुणे शहरामध्ये घरफोडी व वाहनचोरी केल्याची कबूली त्यांनी दिली. त्यांच्याकडून निगडी ठाण्याकडील पाच, विमाननगर चार, हडपसर दोन, चंदननगर दोन, लोणींकद पोलीस ठाण्यातील दोन असे 14 गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून 30 तोळे सोने, चांदीचे दागिने, चार लॅपटॉप, तीन एलईडी टीव्ही, एक मोटार, एक दुचाकी असा 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

दरम्यान, वाहनचोरी करणा-या एका अल्पवयीन चोरट्यालाही निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एक लाख चार हजार रुपयांच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. अल्पवयीन चोरटा निगडीतील अंकुश चौकात संशयितरित्या थांबला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. निगडी ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची त्याने कबुली दिल्याचे, निगडी पोलिसांनी सांगितले. 

निगडी पोलीस तपास करत आहेत.

spot_img
Latest news
Related news