Pimpri: मोठी बातमी! दिल्लीतून आलेले 14 संशयित महापालिका रुग्णालयात दाखल; 18 जणांचा शोध सुरू

एमपीसी न्यूज – दिल्लीच्या निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणे दिसू लागली आहेत. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल 32 नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी 14 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या  ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.  दरम्यान, हे नागरिक शहरात येवून 15 दिवस उलटून गेले. त्यामुळे किती जणांच्या हे संपर्कात आले असतील हे सांगणे कठीण आहे.

आणखी 18 नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. दिल्लीमधील निजामुद्दीन परिसरात तबलीगी जमात या संघटनेच्या वतीने तबलीगी जमात हा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम 1 ते 15 मार्च या कालावधीत पार पडला. कार्यक्रमासाठी भारताच्या विविध भागातून तसेच विदेशातून देखील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. हजारो लोक हे निजामुद्दीनमधील दर्ग्यामधील तबलीगी जमातच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. त्यात परदेशातून आलेल्यांची संख्या देखील मोठी होती. कार्यक्रमातील काही जण हे आधीच कोरोनाबाधित होते. त्यातील काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे.  या कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सहाजणांचा तेलंगणामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे देशभर खळबळ उडाली.

या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एकूण 1,830 जणांची यादी उपलब्ध झाली आहे. 17 राज्यातून आलेल्या   त्यात महाराष्ट्रातील 109 जणांचा समावेश होता.  त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील 32 लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसू लागल्याने खळबळ उडाली आहे.

निजामुद्दीन मरकजमधून आतापर्यंत 1548 जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील 441 जणांना ताप आणि खोकला हीे लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. 1107 जणांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली नाही. त्याला विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या संयोजकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.

हे नागरिक पिंपरी-चिंचवड शहरात येवून 15 दिवस झाले आहेत. महापालिका प्रशासनाने त्या नागरिकांची माहिती काढण्यास सुरुवात केली आहे. आजपर्यंत 32 नागरिक सहभागी झाले होते, अशी माहिती मिळाली. त्यापैकी 14 जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना महापालिका रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे नमुने उद्या तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. उर्वरीत 18 जणांचा शोध घेत आहोत. त्यांची माहिती काढण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. तसेच हे लोक शहरात कधी आले आहेत माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.