Pimpri: ‘कचरा संकलनाच्या निविदेस 15 दिवसांची मुदतवाढ’; ‘स्थायीचा प्रस्ताव आपल्यापर्यंत पोहचला नाही’

आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने मागविलेल्या कचरा संकलन आणि वाहतूक कामाच्या निविदेस  30 ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. तसेच स्थायी समितीने नवीन निविदा प्रक्रिया रद्द करत जुन्याच ठेकेदारांना कंत्राट देण्याचा केलेला ठराव आपल्यापर्यंत पोहचला नसल्याचेही, त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेने कचरा संकलन आणि वाहतूक कामाची नव्याने निविदा काढली. शहरातील कचरा गोळा करणे आणि त्याची मोशी येथील कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्याचे काम ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना 28 कोटी 52 लाख रुपये आणि बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना 27 90 लाख रुपयात  देण्याचे 21 फेब्रुवारी 2018 रोजी स्थायी समितीत निश्चित झाले. दरम्यानच्या काळात स्थायी समितीने 11 एप्रिल 2018 रोजी कचरा संकलन आणि वाहतूक कामाचा ठेका रद्द करत फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला. तसेच आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी आठ कंत्राटदार नेमण्याचा ठराव केला. अचानक आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी एक ऐवजी दोन क्षेत्रीय कार्यालयांसाठी एक कंत्राटदार नेमावा अशी दुरुस्ती स्थायी समितीने केली.

त्यानुसार, आयुक्तांनी कचरा संकलन व वाहतूक कामाची निविदा रद्द केल्याचे 7 मे 2018  रोजी कंत्राटदारांना कळविले आणि नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली. 24 ऑगस्ट 2018 रोजी मेसर्स क्रिसील रिस्क अ‍ॅण्ड इन्फ्रा सोल्युशन्स या सल्लागार संस्थेची थेट पद्धतीने नियुक्ती केली. या सल्लागार संस्थेने कंत्राटाच्या अठीशर्तीत बदल केले. तसेच, अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयासाठी 13 कोटी 17  लाख, ब आणि ड क्षेत्रीय कार्यालयासाठी 15 कोटी 30 लाख, क आणि इ क्षेत्रीय कार्यालय दहा कोटी 91 लाख आणि   ग व  ह क्षेत्रीय कार्यालय 11 कोटी 42  लाख रुपये या प्रमाणे चार निविदा तयार केल्या. 17 सप्टेंबर रोजी निविदा प्रसिद्ध झाल्या. निविदा भरण्यासाठी 28 दिवसांचा कालावधी देण्यात आला.

27  सप्टेंबर 2018 च्या सर्वसाधारण सभेत कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी 570 कोटी रुपये खर्चाच्या चार निविदांना उपसूचनेद्वारे प्रशासकीय मंजुरी घेतली. अचानकच स्थायी समितीने ए.जी. एन्वायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स यांना 22 कोटी 12 लाख रुपये आणि बी.व्ही.जी इंडिया लिमिटेड यांना 21 कोटी 56  लाख रुपयाच या जुन्याच ठेकेदारांना कंत्राट देण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाची अंमलबजावणी केली का? जुन्या निविदा रद्द केल्या का? याबाबतची माहिती पत्रकारांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारली असता ते म्हणाले, स्थायी समितीतील सदस्य ठराव आपल्याकडे अजूनही आलेला नाही. कचरा संकलन आणि वहन कामाची निविदा प्रक्रिया सुरुच आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत कंत्राटदारांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.