Pimpri News: कोविड केअर सेंटर, वैद्यकीय साहित्य पुरवठ्याची ‘सन्मानियांची’ कोट्यावधींची बिले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वपक्षीय नगरसेवकांनी कोरोना संकटाचा फायदा घेत  कोविड केअर सेंटर, कोरोना ग्रस्तांना जेवण, मास्क पुरवठा, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची बिले महापालिकेला सादर केली आहेत. काही नगरसेवकांनी थेट आपल्या नावाने तर काही नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाने हा कारभार केला आहे. मागील काही आठवडे स्थायी समितीने हे सर्व विषय तहकूब ठेवल्याने कोट्यवधींची बिले मंजूर करण्यासाठी संबंधित नगरसेवकांची धावपळ सुरू आहे.

शहरात मार्च 2020 मध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव झाला. त्यानंतर काही दिवसांतच रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली. लक्षणे नसलेले रुग्ण, सौम्य लक्षणे असलेले रुग्ण, गंभीर रुग्ण, हायरिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आलेले नागरिक या सर्वांवर उपचार करण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांबरोबरच खासगी कोरोना केअर सेंटरची उभारण्यात आले होते. यामध्ये 23 कोरोना केअर सेंटर खासगी पद्धतीने सुरू करण्यात आले होते. तर, राज्य शासन, पीएमअरडीए, पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांनी एकत्रितरित्या अण्णासाहेब मगर स्टेडियमवर सुमारे एक हजार बेडचे जम्बो करोना केअर सेंटर उभारले होते.

दरम्यान, राज्य शासनाने साथ रोग परस्थिती घोषित करून कोरोना काळात लागणाऱ्या सर्व गोष्टी थेट पद्धतीने खरेदी करण्याचे आदेश दिले होते. तसेच, कोविड केअर सेंटर, रुग्णांना पुरविण्यात येणारे जेवण, नाश्ता हे सर्व थेट पद्धतीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या गोष्टीचा फायदा घेत शहरातील सर्व पक्षांतील काही नगरसेवकांनी यामध्ये शिरकाव केला. सेंटर उभारणे, रुग्णालयाच्या सेंटरमध्ये भागीदारी घेणे, जेवण पुरवठा करणे, वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणे अशा सर्व गोष्टीत नगरसेवक सहभागी झाले.

ऐन कोरोनाच्या काळात महापालिकेत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या भागात कोविड केअर सेंटरची किती गरज आहे, हे सांगत स्वतः सेंटर उभारली. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरीही सेंटर कशी सुरू राहतील, यासाठी प्रयत्नशील  राहिले.  आता शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने बहुतांश कोविड सेंटर बंद केले आहेत. त्यामुळे आता सेंटर चालक महापालिकेकडून बिले वसुलीच्या मागे लागले आहेत. मात्र, कोविड केअर सेंटरची बिले मोठया प्रमाणात वाढवून लावल्याचा संशय आल्याने स्थायी समितीने वैद्यकीय विभागाकडे या बाबतची सविस्तर माहिती मागविली.

मात्र, दीड ते दोन महिने होऊनही वैद्यकीय विभागाला या हिशोबाचा मेळ लागला नाही. राजकीय पुढारी, नगरसेवकांनी वाढीव बिले सादर केल्याने  या खर्चाचा मेळ बसत नाही, असा आरोप   वैद्यकीय विभागावर केला जात आहे.  स्थायी समितीच्या बैठकीत विविध प्रकारच्या सात ते आठ विषयांची बिले मंजूर करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती समोर होता. सुमारे 15 कोटींचा हा प्रस्ताव होता.  मात्र, वैद्यकीय विभागाने सविस्तर माहिती सादर न केल्याने हे विषय स्थायी समितीने तहकूब ठेवले आहेत. आजच्या स्थायी समिती सभेसमोर हे विषय ठेवण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.