Pune : भामा-आसखेडच्या पाण्यासाठी स्थायी समितीची 162 कोटी मंजुरी 

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड धरणातील पाण्याच्या आरक्षणा पोटी सिंचन पुनर्स्थापना खर्चाचे 165 कोटी रुपये आणि त्यावरील 2013 पासूनचे 12 टक्के दराने विलंब शुल्क देण्यासाठज स्थायी समितीने एकमताने मंजुरी दिली आहे. पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकापासून टप्प्याटप्प्याने तरतूद करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. 

शहराच्या पूर्व भागासाठी खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणातून पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. या धरणातील सव्वा दोन टीएमसी पाणीसाठा शासनाने शहरासाठी मंजूर केला आहे. तब्बल 380 कोटींच्या या योजनेचे काम 2014लाच सुरू झाले असून स्थानिकांच्या आंदोलनामुळे अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. त्यातच आता राज्य सरकारच्या नियमाप्रमाणे सिंचन पुनर्स्थापनाचा खर्च प्रति हेक्‍टरी एक लाख रुपये आणि भाववाढ निर्देशांक क्षेत्रानुसार आकारला जात आहे.

त्यानुसार पुणे पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता यांनी पालिकेला आरक्षणा पोटी सुधारित खर्चाची सिंचन पुनर्स्थापना रक्कम 165 कोटी भरणे आवश्यक असल्याचे कळवले आहे. या रकमेवर 22 जून 2013 पासून 12 टक्के दराने विलंब शुल्क भरणे आवश्यक आहे. ही रक्कम भरल्याशिवाय पालिकेबरोबर करारनामा करता येणार नाही अन्यथा पाण्याचा आरक्षण कोटा रद्द करावा लागेल असा इशारा पाटबंधारे खात्याने दिला आहे. त्यानुसार आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीपुढे हा प्रस्ताव ठेवला होता त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली अशी माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.