पिंपरीत 17 ते 20 मार्च दरम्यान होणार ‘डिपेक्स’ प्रदर्शन

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांमधील उद्योजकतेला वाव मिळावा आणि नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सृजन संस्थेतर्फे घेण्यात येणारे ‘डिपेक्स’ प्रदर्शन 17 ते 20 मार्च दरम्यान पिंपरीत होणार आहे.
‘डिपेक्स’ समितीचे अध्यक्ष हनुमंत गायकवाड, उपाध्यक्ष डॉ. सोमनाथ पाटील, डिपेक्स समितीच्या निमंत्रक प्रा. सरिता बलशेटवार यांनी याबाबत पत्रकारपरिषदेत माहिती दिली. यावेळी समितीचे सचिव दीपक पांचाल, सहसचिव विवेक सिनारे, अॅड. श्रीकांत दळवी, आनंद कुलकर्णी, अभाविपचे शहर मंत्री नकुल वाजे उपस्थित होते. पिंपरी, येथील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स (एच.ए) मैदानावर 17 ते 20 मार्च दरम्यान डिपेक्स प्रदर्शन होणार आहे.
डिपेक्स हा उपक्रम अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठा उपक्रम आहे. 1986 पासून डिपेक्स प्रदर्शनाला सुरुवात केली आहे. यंदाचे 28 वे वर्ष आहे. अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षातील मुलांचे प्रकल्प डिपेक्समध्ये सादर केले जातात. पहिल्या डिपेक्स प्रदर्शनात 16 प्रकल्प आले होते. प्रदर्शन आणि स्पर्धा ही डिपेक्सची संकल्पना आहे. 1990 पासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचे प्रक्लप घेण्यास सुरुवात झाली. ‘सृजन’ आणि ‘शोध’ या नावाने स्पर्धा घेण्यात येत आहेत. प्रदर्शनात विज्ञान, अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
यंदा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील महाविद्यालयातील 22 हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यामध्ये 5 हजार प्रकल्प सादरीकरण करण्यात येणार आहेत. चार दिवस प्रदर्शन होणार असून एक दिवस उद्योजकांच्या भेटीसाठी राखीव ठेवला असल्याची माहिती, आनंद कुलकर्णी यांनी दिली.
यंदाच्या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून 623 प्रकल्प आले होते. त्यापैकी 259 पात्र ठरले आहेत, असे बलशेटवार यांनी सांगितले. 17 मार्चला सायंकाळी प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. 18, 19 मार्चला महाविद्यालयाच्या भेटी असणार आहेत. 20 मार्चला पारितोषिक वितरण होणार आहे.
यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन कार्यशाळा होणार आहेत. तसेच बँकिंगबाबत, पेटंट कसे मिळवायचे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये ‘स्टार्ट अप इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘स्टॅन्ड अप इंडिया’ या योजनांविषयी माहिती दिली जाणार आहे. त्याचबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये असलेल्या उद्योगाबद्दल प्रदर्शनात माहिती देण्यात येणार आहे.
डिपेक्स प्रदर्शनासाठी विनामूल्य प्रवेश आहे. शहरातील जास्तीत-जास्त विद्यार्थी, नागरिकांनी प्रदर्शनाला भेट द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.