सोमवार, ऑक्टोबर 3, 2022

बोटावरील शाईप्रमाणे हातावर मेंदी काढून महिला मतदारांचा सन्मान

लोकशाहीचा उत्सव वाढविण्याकरिता महिला व तरुणींचा पुढाकार

मृगनयनी मेंदी आर्टस् आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आयोजन

एमपीसी न्यूज – बोटावरील शाईप्रमाणे हातावर मेंदी काढून लोकशाहीचा उत्सव साजरा करुया, असा संदेश मतदान केंद्राबाहेर पडणा-या महिला मतदारांना देत त्यांच्या हातावर मेंदी काढून सन्मानित करण्यात आले. ज्याप्रमाणे बोटावर शाई लावून मतदारांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाल्याबद्दल प्रोत्साहित केले जाते. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये 50 टक्के सहभागी असणा-या महिला आणि तरुणींनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, यासाठी बोटावरील निळ्या शाईप्रमाणे नक्षीदार मेंदीने महिलावर्गाचा अनोखा सन्मान करण्यात आला.

शुक्रवार पेठेतील मृगनयनी मेंदी आर्टस् आणि बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टने या अनोख्या उपक्रमाचे आयोजन केले होते. शहराच्या मध्य भागातील बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशाला, आदर्श विद्यालय, गोपाळ हायस्कूल आणि नूतन मराठी विद्यालय प्राथमिक व माध्यमिक शाळा या परिसरात मृगनयनी मेंदी आर्टस्च्या धनश्री हेंद्रे आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मतदारांच्या हातावर मेंदी काढली. तर साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा आणि कार्यकर्त्यांनी मतदान जनजागृती केली. ललिता दर्गे, मेघा मेहेत्रे, रश्मी भंडारी, पल्लवी बंबोली, अक्षदा व्यास, मोनिका शर्मा, अक्षय भोई, बालाजी गोडगिरी, प्रिती तांदळे, योगिता भांबुरे, साक्षी म्हस्के, शिल्पा रेळेकर, स्मिता काळे, प्रिया पाटोळे, किर्ती मोहिते आदींनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.

धनश्री हेंद्रे म्हणाल्या की, महिलांनी मोठया संख्येने मतदान करावे. यासाठी आम्ही ज्या महिला व तरुणी मतदान करून लोकशाही बळकटीकरणाकरिता पुढाकार घेतात, अशा महिलांचा मेंदी काढून सन्मान केला. या माध्यमातून लोकशाहीचा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा हा प्रयत्न होता.

साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा म्हणाले की, मतदान करून लोकशाही बळकट करण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. प्रामुख्याने महिला वर्गाला प्रोत्साहित करून मतदानाची संख्या वाढवावी. तसेच पहिल्यांदा मतदान करणा-या महिला आणि तरुणींना हा मतदानाचा क्षण कायमचा लक्षात रहावा, यासाठी मेंदी काढून त्यांचा सन्मान करण्यात आला.

spot_img
Latest news
Related news